मुंबई पोलीस आयुक्त राकेश मारिया यांनी कुणातरी नेत्याच्या वा बडय़ा वकिलाच्या सांगण्यावरून ललित मोदी यांची लंडनमध्ये भेट घेतली असावी, असा संशय उपस्थित करून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी नव्या वादाला तोंड फोडले आहे.
माजी केंद्रीय मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, अर्थमंत्री अरुण जेटली, माजी केंद्रीय मंत्री राजीव शुक्ला, खा. अनुराग ठाकूर हे क्रिकेट संघटनांवर वर्चस्व असलेले बडे नेते आहेत. आघाडी सरकारच्या काळात गृह खाते राष्ट्रवादी काँग्रेसकडे होते. त्या पाश्र्वभूमीवर मारिया यांना ललित मोदी यांची भेट घ्यावयास सांगणारी ‘पॉवरफुल’ राजकीय व्यक्ती कोण, यावर चर्चा सुरू झाली आहे. ललित यांची भेट घेतल्याप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राकेश मारिया यांना ‘क्लीन चिट’ दिली आहे. त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना चव्हाण म्हणाले की, आपण कुणातरी मोठय़ा वकिलाच्या सांगण्यावरून मोदी यांना भेटल्याचे मारिया म्हणतात. त्यांना त्यांचे नाव आठवत नाही. यावर विश्वास ठेवणे अवघड आहे. कुणा नेत्याने मोदी यांना भेटण्याची सूचना केली हे मारिया यांनीच स्पष्ट करावे, असे ते म्हणाले.