कॅनडामध्ये गांजाचा नशा करणारे आता कोणाच्याही आडकाठीशिवाय या नशेचं सेवन करु शकणार आहेत. कारण येथे गांजा बाळगणे किंवा त्याची विक्री करणे याला कायदेशीर मान्यता मिळाली आहे. वैद्यकीय मारिजुआना म्हणजेच गांजा यापूर्वीच कॅनडामध्ये कायदेशीर असून आता ड्रग म्हणूनही येथे गांजाला परवानगी मिळाली. उरूग्वेनंतर गांजाला कायदेशील मान्यता देणारा कॅनडा जगातला दुसरा सर्वात मोठा देश ठरला आहे.

(Photo Credit – Chris Wattie/Reuters)

17 ऑक्टोबरच्या मध्यरात्रीपासून या निर्णयाची अंमलबजावणी झाली. गांजाला कायदेशीर मान्यता मिळताच येथे अनेक ठिकाणी गांजाची दुकानंही सुरू झाली. या दुकानांबाहेर मोठमोठ्या रांगाही पाहायला मिळाल्या. अनेक वर्षांपासून येथे गांजाला कायदेशीर मान्यता देण्याची मागणी होत होती. त्यानंतर ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत गांजा कायदेशीर करण्याची घोषणा कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी केली होती. गांजा खरेदी करताना काही अटी घालण्यात आल्या आहेत. यामध्ये महत्त्वाची अट म्हणजे एकावेळी केवळ 30 ग्राम गांजा खरेदी करता येणार आहे.

मध्यंतरी लंडनच्या क्वीन मेरी युनिव्हर्सिटीतील शोधकर्त्यांनीही केलेल्या अभ्यासानंतर, कर्करोगाने ग्रस्त असलेल्यांच्या उपचारात गांजा अत्यंत महत्त्वाची भूमिका निभावू शकतो असं म्हटलं होतं. अभिनेता उदय चोप्रानेही भारतात गांजा कायदेशीर करण्याची मागणी केली होती. त्यानंतर मुंबई पोलिसांनी त्याचा समाचार घेतला होता, तर सोशल मीडियाच्या युजर्सनी त्याच्यावर टीकेचा भडीमार केला होता.