भारताच्या ‘विक्रांत’ या सर्वात मोठ्या विमानवाहू युद्धनौकेच्या सागरी चाचण्या सुरू करण्यात आल्या आहेत. ही युद्धनौका स्वदेशी असून भारतीय नौदलासाठी या सागरी चाचण्या ऐतिहासिक ठरत आहेत.

नौदलाने सांगितले की, या विमानवाहू युद्धनौकेच्या सागरी चाचण्या सुरू झाल्या असून भारत आता विमानवाहू युद्धनौका तयार करण्यात स्वयंपूर्ण असलेल्या निवडक देशांच्या पंक्तीत जाऊन बसला आहे. २०१३ सालापासून या युद्धनौकेची बांधणी करण्याचे काम चालू झाले होते. ही विमानवाहू युद्धनौका ४० हजार टन वजनाची आहे. पन्नास वर्षापूर्वी याच नावाच्या युद्धनौकेने १९७१ च्या युद्धात मोठी कामगिरी केली होती. विक्रांत युद्धनौका तयार करण्यास २३ हजार कोटी रुपये खर्च करण्यात आले असून भारतीय नौदलात ही युद्धनौका सामील करण्याची प्रक्रिया पुढील वर्षीच्या उत्तरार्धात सुरू होईल.

भारतीय नौदलाचे प्रवक्ते कमांडर विवेक मधवाल यांनी सांगितले, की भारतासाठी हा अभिमानाचा दिवस असून विक्रांतचा पुनरावतार आता सागरी चाचण्यांसाठी सिद्ध झाला आहे. आत्मनिर्भर भारत व मेक इन इंडियाचे उद्दिष्ट साध्य करणारा हा उपक्रम असून स्वदेशी विमानवाहू युद्धनौका तयार केल्याने भारत आता निवडक देशांच्या यादीत गेला आहे.

‘विक्रांत’ची वैशिष्ट्ये : विक्रांत युद्धनौका ही २६२ मीटर लांब व ६२ मीटर रुंद असून कोचिन शिपयार्ड लि. या कंपनीने ती तयार केली आहे. जूनमध्ये संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी या युद्धनौकेच्या बांधणीचे निरीक्षण केले होते. या युद्धनौकेवर एकावेळी ३० लढाऊ जेट विमाने व हेलिकॉप्टर्स राहू शकतात. या युद्धनौकेत मिग २९ के लढाऊ जेट विमाने व केए ३१ हेलिकॉप्टर्स ठेवण्यात येणार आहेत. सध्या भारताकडे ‘विक्रमादित्य’ ही एकच विमानवाहू युद्धनौका आहे. भारतीय नौदल हिंदी महासागरातील चीनचे वाढते वर्चस्व रोखण्यासाठी प्रयत्नशील असून भारतीय नौदलासाठी हिंदी महासागर सामरिकदृष्ट्या महत्त्वाचे क्षेत्र आहे.