झकरबर्ग यांचा यंदाच्या वर्षांतील संकल्प
फेसबुकचे संस्थापक मार्क झकरबर्ग यांनी हॉलिवूडच्या विज्ञान-तंत्रज्ञान पटात दाखवलेला असतो तसा व्यक्तिगत सेवक कृत्रिम बुद्धिमत्तेच्या तंत्राने तयार करण्याचे ठरवले असून २०१६ या वर्षांत त्यांनी ते व्यक्तिगत आव्हान ठेवले आहे. हॉलिवूडच्या विज्ञान-तंत्रज्ञान पटात जार्विस नावाचा कृत्रिम बुद्धिमत्ता असलेला सेवक दाखवला आहे, तसाच प्रत्यक्षात तयार करण्याचा आपला मानस असल्याचे सांगू झकरबर्ग यांनी फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे, की साध्या कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून हा यंत्रमानव सेवक तयार करण्याचे मी ठरवले आहे. हॉलिवूडच्या ‘आयर्न मॅन’ या चित्रपटात जार्विस नावाचा यांत्रिक सेवक दाखवलेला आहे. तो यांत्रिक सेवक माझ्या घरात काम करील व मला कामात जार्विसप्रमाणे मदत करील.
कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान आधीच विकसित करण्यात आलेले आहे फक्त त्याच्या मदतीने मी जार्विसची निर्मिती करणार आहे. घरातील संगीत, दिवे, तपमान हे सगळे नियंत्रित करण्यास त्याला शिकवले जाईल.
या यंत्रमानव सेवकाचे संकेतांकन करणे, त्याला माझ्या मित्रांचे चेहरे ओळखायला शिकवणे हे माझे उद्दिष्ट राहील. माझी मुलगी मॅक्स हिच्या खोलीत काय चालले आहे हे मला मी घरात नसतानाही कळू शकेल अशी व्यवस्था करण्याचा विचार आहे. माझ्या संस्था व्यवस्थित चालवण्यासाठी मला आभासी पद्धतीने माहिती संस्करणाची सेवाही तयार करावी लागणार आहे. स्वत:साठी काहीतरी यंत्रे बनवावीत ही यामागची प्रेरणा आहे. यापूर्वी झकरबर्ग यांनी मँडरिन भाषा शिकणे हे आव्हान ठेवले होते व महिन्याला दोन पुस्तके वाचण्याचे ठरवले होते, त्याचबरोबर रोज एका नव्या व्यक्तीला भेटणे हे एक उद्दिष्ट होते. त्यांच्या पत्नी प्रिसिला चॅन या चिनी आहेत. दरवर्षी मी नवीन आव्हाने ठरवतो, नवीन गोष्टी करण्याचे निश्चित करतो, फेसबुकच्या व्यतिरिक्त या बाबी असतात. तांत्रिक प्रकल्पांचा सखोल अभ्यास हे मोठे काम असते. गेल्या महिन्यात झकरबर्ग यांनी फेसबुकमधील त्यांचे ९९ टक्के शेअर्स दान करण्याचा निर्णय जाहीर केला होता. शेअर्स विक्री वरील कर टाळण्यासाठी त्यांनी दान करण्याची योजना मुलीच्या वाढदिवशी जाहीर केली अशी टीका काहींनी केली होती.