फेसबुकचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि सह-संस्थापक मार्क झकरबर्ग यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची स्तुती केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मिडियाचा वापर करुन जनतेशी थेट संवाद साधला आणि कारभारात पारदर्शकता आणली असे ते म्हणाले आहे.  झकरबर्ग यांनी त्यांच्या फेसबुक अकाउंटवर एक मोठी पोस्ट टाकली आहे.  या पोस्टमध्ये भविष्य कसे असावे, हे जग अधिक चांगले व्हावे यासाठी आपण काय करू शकतो याची  चर्चा त्यांनी केली आहे.

जगात अनेक देशांमध्ये लोकशाही आहे. लोकशाहीद्वारे निवडून आलेल्या नेत्यांची जबाबदारी केवळ निवडणुकांपुरती मर्यादित नाही. त्याही पलीकडे जाऊन त्यांनी जनतेशी आपला संपर्क ठेवणे महत्त्वाचे आहे असे ते म्हणाले. भारतामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल माध्यमांचा योग्य वापर करून जनतेशी आपला संपर्क ठेवला आहे. तसेच आपल्या मंत्र्यांनांही त्यांनी फेसबुकद्वारे जनतेशी संपर्क ठेवावा असे आवाहन केले आहे. हे प्रशंसनीय आहे असे ते म्हणाले.

मंत्र्यांना केलेले कामे आणि त्यांच्या योजना या फेसबुकद्वारे शेअर केल्या जातात. यामुळे आपले काम आपण जबाबदारीने करत आहोत की नाही हे कळते असे ते म्हणाले. केवळ निवडणुकांपुरते मर्यादित न राहता  जनतेच्या समस्या सोडवणे, ही नेत्यांसाठी एक मोठी संधी असल्याचे झकरबर्ग म्हणाले. पंतप्रधान मोदींनी नेमकं हेच केले असल्याचे ते म्हणाले. मोदींनी आपल्या मंत्र्यांना फेसबुक वापरण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे लोकांकडून थेट प्रतिक्रिया मिळतात आणि प्रशासन त्या प्रमाणे काम करू शकते असे ते म्हणाले.

झकरबर्ग यांनी आणखी एक महत्त्वपूर्ण उदाहरण दिले. केनियामध्ये असे एक गाव आहे तिथे सर्वजण एका व्हॉट्सअॅप ग्रुपच्या माध्यमातून एकमेकांशी जोडलेले आहेत. त्या गावातील सर्व नेते मंडळी आणि अधिकारी देखील त्या ग्रुपवर आहेत. त्यामुळे त्यांना एकमेकांच्या सतत संपर्कात राहता येते तसेच आपल्या समस्या मांडता येतात.  २१ शतक्यात जनतेशी थेट संपर्काचे माध्यम म्हणून सोशल मिडियाचे अस्तित्व कोणीच नाकारू शकत नाही असे ते म्हणाले.

१९६० मध्ये जनतेशी संपर्काचे माध्यम टी. व्ही. झाले होते तर २१ व्या शतकात सोशल मिडिया हेच सर्वात मोठे माध्यम ठरणार असल्याचे ते म्हणाले. आपल्या पोस्टमध्ये ते पुढे म्हणाले की केवळ देश किंवा शहरे एकमेकांशी जोडून चालणार नाही तर सर्व जग एकत्र आले पाहिजे असे ते म्हणाले. जगातील काही लोक, समुदाय यांच्यापर्यंत अद्याप जागतिकीकरणाचे फायदे पोहचत नसल्याचे ते म्हणाले. त्यांना या प्रक्रियेपासून दूर ठेवले जात असल्याचे ते म्हणाले. त्यांना या प्रक्रियेत सहभागी करुन घेऊन त्यांच्या आयुष्यात सुधारणा घडवून आणणे अगत्याचे आहे असे ते म्हणाले.