‘व्हॉटसअ‍ॅप’ आणि ‘इंस्टाग्राम’ या दोन मॅसेंजर सेवा खासगी आयुष्यात हस्तक्षेप करत असल्याचा आरोप एका नागरिकाने केल्यानंतर दक्षिण इराणमधील एका न्यायाधीशाने फेसबुकचा संस्थापक, सीईओ मार्क झुकेरबर्ग याला न्यायालयात हजर राहण्याचा आदेश दिला आहे. इराणमधील निमसरकारी वृत्तसंस्थेने ही बातमी प्रसिद्ध केली आहे.
निमलष्करी बसीज दलातील अधिकारी रुहोल्लाह मोमेन नसाब याने ही माहिती या वृत्तवाहिनीला दिली. यात तो म्हणाला की, न्यायाधीशांनी झुकेरबर्गला न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेतच, पण न्यायाधीशांनी दोन्ही मॅसेंजर सेवा बंद करण्याचेही आदेशात म्हटल्याचे नसाबने स्पष्ट केले.  
परंतु इराण आणि अमेरिका यांच्यात प्रत्यार्पण करार न झाल्याने झुकेरबर्गला इराणच्या न्यायालयात हजर करणे हे जवळपास अशक्य आहे. याधीही इराण न्यायालयाने अशा स्वरूपाचे अनेक आदेश दिले होते, परंतु ते अमलात मात्र आले नाहीत. न्यायालयाच्या आदेशानंतर मॅसेंजर सेवा ब्लॉक करण्यात येतात, परंतु काही काळानंतर त्या सुरू करण्यात येतात.
इराणमध्ये फेसबुकवर याआधीच बंदी घालण्यात आली आहे. याशिवाय ट्विटर आणि युटय़ूबवरही बंदी आहे. तरीही परराष्ट्रमंत्री मोहम्मद जवाद झरीफ हे ट्विटरवर असतात. यात काही प्रशासकीय अधिकाऱ्यांचा समावेश आहे. तरुणवर्गही मोठय़ा प्रमाणावर सोशल मीडियावर आपल्या भावना, विचार व्यक्त करत असतात. काहीजण सोशल मीडियावरील सरकारी नियंत्रणाच्या कात्रीत न सापडण्यासाठी खोटे आयडी तयार करतात.