भारत भेटीवर आलेला फेसबुकचा संस्थापक मार्क झकरबर्गने मंगळवारी आग्रा येथील ऐतिहासिक ताजमहालला भेट दिली. ‘ताजमहाल’चे सौंदर्य पाहून थक्क झाल्याची प्रतिक्रिया झकरबर्गने दिली आहे. झगरबर्ग बुधवारी ‘आयआयटी दिल्ली’च्या विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहे. त्याआधी झकरबर्गने मंगळवारी ‘ताजमहाल’ला भेट दिली. ताजमहालला भेट दिल्यानंतर झकरबर्गने आपल्या फेसबुक पेजवर ताजमहाल भेटीची छायाचित्रे पोस्ट केली आहेत.
‘ताजमहाल पाहण्याची भरपूर इच्छा होती. ही वास्तू कल्पनेपेक्षाही कितीतरी पटीने सुंदर आहे. इतकी अप्रतिम वास्तू कशी  साकारण्यात आली या विचारनेच मी थक्क झालो. प्रेमच एक अशी गोष्ट आहे की जी आपल्याला अशा सुंदर गोष्टी साकारण्यास प्रोत्साहन देत असते’, असे झकरबर्गने म्हटले आहे.
दरम्यान, झकरबर्ग आज ‘आयआयटी दिल्ली’ला भेट देणार असून तेथील टाऊनहॉलमध्ये उपस्थित ९०० विद्यार्थ्यांशी तो संवाद साधणार आहे. आपली कंपनी(फेसबुक) आणि त्याच्याविषयी येथील युवापिढी काय विचार करते हे झकरबर्ग विद्यार्थ्यांकडून जाणून घेणार आहे. तर, विद्यार्थी देखील सोशल नेटवर्कींगसंदर्भातील अनेक मुद्द्यांवर झकरबर्गशी संवाद साधण्यास उत्सुक आहेत.