जर आपल्याविरोधात महाभियोग चालवला तर अमेरिकन अर्थव्यवस्था कोलमडेल असं वक्तव्य अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी ‘फॉक्स अॅण्ड फ्रेंड्स’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं आहे की, ‘मला तुम्हाला सांगायचं आहे की जर माझ्याविरोधात कधीही महभियोग चालवण्यात आला तर बाजार कोलमडेल. मला वाटतं प्रत्येकजण गरीब होईल’. डोनाल्ड ट्रम्प यांचे माजी प्रचारप्रमुख पॉल मॅनफोर्ट आणि माजी वकील मायकेल कोहेन वेगवेगळ्या गुन्ह्यंत दोषी आढळले आहेत. ट्रम्प यांच्याशी असलेल्या संबंधांबाबत मौन पाळण्यासाठी दोन महिलांना अध्यक्षीय निवडणुकीआधी पैसे दिल्याची कबुली कोहेन यांनी दिली आहे. ट्रम्प यांच्या कायदेशीर अडचणी वाढल्या असून त्यासंबंधी विचारण्यात आलेल्या प्रश्नावर उत्तर देताना त्यांनी हे वक्तव्य केलं.

डोनाल्ड ट्रम्प बोलले आहेत की, ‘मला कळत नाही अशा व्यक्तीवर तुम्ही महाभियोग कसं काय चालवू शकता ज्याने इतके रोजगार दिले आहेत’. याआधी ट्रम्प यांनी कोहेन यांच्यावर टीका करताना, ते चांगले वकिल नसून मनातल्या गोष्टी सांगत असल्याचं म्हटलं होतं. ट्रम्प यांनी ट्विट करत जर कोणी चांगला वकिल शोधत असेल तर त्याने कोहेन यांची निवड करु नये असा सल्लाही दिला होता.

ट्रम्प यांना बुधवारी दोन धक्के बसले. माजी प्रचारप्रमुख पॉल मॅनफोर्ट आणि माजी वकील मायकेल कोहेन वेगवेगळ्या गुन्ह्यंत दोषी आढळले. ‘‘दोन महिलांनी ट्रम्प यांच्याशी असलेल्या संबंधांबाबत जाहीर वाच्यता करण्याचे २०१६ च्या निवडणुकीआधी ठरवले होते. या प्रकाराबाबत मौन पाळण्यासाठी पॉर्न अभिनेत्री स्टॉर्मी डॅनियल्सबरोबरच आणखी एका महिलेला २ लाख ८० हजार डॉलर देण्यात आले’’, अशी कबुली कोहेन यांनी न्या. विल्यम पॉली यांच्या न्यायालयात दिली. या प्रकरणात कोहेन यांना १२ डिसेंबर रोजी शिक्षा सुनावण्यात येणार आहे.

ट्रम्प यांचे माजी प्रचारप्रमुख मॅनफोर्ट यांना करचुकवेगिरी, बँक घोटाळा, परदेशी बँक खात्यांची माहिती न देणे या आरोपांखाली दोषी ठरवण्यात आले. विशेष वकील रॉबर्ट म्यूलर यांनी अध्यक्षीय निवडणुकीत रशियाने केलेल्या हस्तक्षेपाची चौकशी केली होती. त्यात ही दोन प्रकरणेही उघड झाली. ‘‘पॉल मॅनफोर्ट हे चांगले व्यक्ती आहेत. या प्रकरणात माझा संबंध नाही. पण जे घडले ते वाईट आहे’’, असे ट्रम्प यांनी म्हटले होते. कोहेन प्रकरणात अध्यक्षांविरोधात कुठलेही आरोप नाहीत, असे ट्रम्प यांचे वकील रुडॉल्फ गिलियानी यांनी सांगितले.

डेमोक्रॅटिक सदस्यांनी मात्र ट्रम्प यांच्यावर दबाव वाढवला असून प्रतिनिधिगृहाच्या नेत्या नॅन्सी पेलोसी यांनी ट्रम्प यांच्या राजवटीत गुन्हेगारी व भ्रष्टाचार वाढल्याचे म्हटले होते.