डॉक्टरांना भेट वस्तू, परदेश दौरे, पैसे देण्यावर बंदीचा प्रस्ताव
आपल्याच कंपनीची औषधे डॉक्टरांनी रुग्णांना लिहून द्यावीत यासाठी औषध कंपन्या त्यांच्या प्रतिनिधींमार्फत डॉक्टरांना भेटवस्तू देत असतात. आता या कृतीवर बंदी आणण्याचा विचार सरकार करीत आहे. कंपन्या डॉक्टरांना भेटवस्तू, पैसे व आदरातिथ्याच्या नावाखाली बरेच काही देत असतात, पण औषध कंपन्यांना आता विपणनाचे निकष ठरवून दिले जाणार आहेत व ते बंधनकारक असतील. त्यात डॉक्टरांना खुश करण्यासाठी औषध कंपन्यांना या गैरमार्गाचा अवलंब करता येणार नाही.
औषध कंपन्यांसाठी विपणन आचारसंहिता सध्याही असून तिची अंमलबजावणी ऐच्छिक आहे. या आचारसंहितेला डिसेंबर २०१५ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. काही महिन्यांनी तिची अंमलबजावणी सक्तीची केली जाणार आहे.
औषध खात्याने औषध विपणन संकेतावली तयार केली असून ती सध्या अनिवार्य नसली तरी १ जानेवारीपासून ऐच्छिक अंमलबजावणी सुरू झालेली आहे. कंपन्यांनी नमुना म्हणून औषधे देऊ नयेत, विशेष करून झोपेच्या गोळ्या व मन शांत करणारी औषधे यात दिली जाऊ नयेत असे नियमात म्हटले आहे.
डॉक्टरांना परदेश दौरे दिले जातात. भेटवस्तू दिल्या जातात. पण आता नवीन संकेतावलीचे पालन बंधनकारक करण्यात येत असून ती कारवाई येत्या काही महिन्यातच होईल, असे सरकारी अधिकाऱ्यांनी सांगितले.
भारताचे औषध नियंत्रक, आरोग्य मंत्रालय व स्वयंसेवी संस्था यांच्यात याबाबत चर्चा सुरू आहे. औषध कंपन्यांच्या विपणन संहितेत वैद्यकीय यंत्रेही येतात. या संहितेनुसार कंपन्या वैद्यकीय संशोधनासाठी व अभ्यासासाठी मान्यताप्राप्त संस्थांनाच पैसे देऊ शकतात आणि तसे केल्याचे जाहीर करणे आवश्यक आहे. मोफत औषधे व दृश्यचित्रफितीतून जाहिरात यावरही कठोर अटी टाकण्यात आल्या आहेत.