News Flash

लग्न झालेल्या महिला लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या महिलांपेक्षा आनंदी – आरएसएस

महिलांविषयीच्या 'स्टेट्स ऑफ विमेन' नामक या सर्वेक्षण अहवालाचे येत्या २४ सप्टेंबर रोजी नवी दिल्लीत रा. स्व. संघाचे प्रमुख मोहन भागवत यांच्या हस्ते प्रकाशन होणार आहे.

संग्रहित छायाचित्र

लिव्ह-इन-रिलेशनशीपमध्ये राहणाऱ्या महिलांपेक्षा लग्न झालेल्या महिला या खूपच अधिक प्रमाणात आनंदी असतात, असा दावा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून करण्यात आला आहे. महिलांसंदर्भात अभ्यास करणाऱ्या पुण्यातील संघाशी संलग्न ‘दृष्टी स्त्री अध्यासन प्रबोधन केंद्रा’च्या एका सर्वेक्षणातून हे निष्कर्ष समोर आल्याचे सांगण्यात आले आहे.

महिलांविषयीच्या ‘स्टेट्स ऑफ विमेन’ नामक या सर्वेक्षण अहवालाचे येत्या २४ सप्टेंबर रोजी नवी दिल्लीत रा. स्व. संघाचे प्रमुख मोहन भागवत यांच्या हस्ते प्रकाशन होणार आहे. या प्रकाशनानंतर समाजातील महिलांच्या स्थितीशी संबंधित विविध विषयांवर राष्ट्रीय स्तरावर चर्चा व्हावी यासाठी टप्प्याटप्प्याने राज्यव्यापी प्रकाशन करण्यात येणार आहे. राजस्थानमधील पुष्कर येथे सुमारे तीन डझन संघाशी संलग्न संघटनांच्या ‘समन्वय बैठकीत’ या सर्वेक्षणातील निष्कर्षांवर चर्चा झाली. ‘दृष्टी’च्या प्रतिनिधींनी यावेळी एक सादरीकरण केले ज्यामध्ये सर्वेक्षणातील महत्त्वाचे निष्कर्ष समोर मांडण्यात आले. ‘द प्रिंट’ने यासंदर्भात वृत्त दिले आहे.

या सर्वेक्षण अहवालात म्हटल्याप्रमाणे, लग्नामुळे महिलांना स्थिरता येते तसेच संबंधित महिलेचा अत्युच्च आनंद आणि कल्याणात वाढ होते. महिलांची मिळकत आणि आनंद याचा परस्पर संबंध नसल्याचेही या सर्वेक्षणातील निष्कर्षांमध्ये म्हटले आहे. जवळपास सर्व प्रकारची कामे करणाऱ्या महिलांमध्ये ही बाब सारखीच असून अध्यात्मिक क्षेत्रात समर्पित असलेल्या महिलांचे कौटुंबिक उत्पन्न नसतानाही त्या सर्वोच्च पातळीवरील आनंद अनुभवत असल्याचेही यात म्हटले आहे. तसेच आनंद आणि कल्याणाच्या पातळीमध्ये सर्वाधिक टक्केवारी पदव्युत्तर शिक्षण आणि पीएचडी स्तरावरील स्त्रियांमध्ये दिसून आली असून सर्वात कमी टक्केवारी निरक्षर महिलांमध्ये दिसून आल्याचा दावाही यातून करण्यात आला आहे.

५० ते ६० वयोगटातील महिला सर्वाधिक आनंदी असतात

या सर्वेक्षणातून असाही निष्कर्ष काढण्यात आला आहे की, ५० ते ६० या वयोगटातील महिला या सर्वाधिक आनंदी असतात. कारण, या वयोगटातील महिला या सर्वसाधारणपणे सर्व कौटुंबिक जबाबदाऱ्यांमधून मुक्त झालेल्या असतात त्याचा त्यांच्या मानसिक सकारात्मकतेकवर परिणाम होतो. मात्र, ६० वर्षे वयानंतरच्या महिलांमध्ये हा आनंद कमी व्हायला लागतो. कारण, या काळात महिलांना त्यांच्या जगण्याबाबत असुरक्षित वाटत असते कारण याला त्यांच्यामध्ये निर्माण होत असलेले आरोग्याचे प्रश्न, त्यांच्यातील एकटेपणा कारणीभूत असतो.

महिलांविषयीचे हे आजवरचे सर्वाधिक मोठे सर्वेक्षण असल्याचा दावा या संस्थेने केला आहे. २०१७-१८ या दोन वर्षांच्या कालावधीत देशभरात हे सर्वेक्षण करण्यात आले असून यामध्ये २९ राज्ये, पाच केंद्रशासित प्रदेशांचा समावेश आहे. यामध्ये एकूण ७२७ जिल्ह्यांपैकी ४६४ जिल्ह्यांमध्ये अर्थात ६४ टक्के जिल्ह्यांमध्ये हे सर्वेक्षण पार पडले आहे. याकरीता ७००० स्वयंसेवकांसाठी ५२१ प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आले होते. यामध्ये १८ वर्षांवरील ४३,२५५ महिलांच्या मुलाखती घेण्यात आल्या होत्या.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 16, 2019 2:52 pm

Web Title: married women are happiest than women in live in relationships says rss aau 85
Next Stories
1 ‘गुरुत्वाकर्षणामुळे रुपयाची घसरण’, शोभा डे यांनी उडवली निर्मला सीतारामन यांची खिल्ली
2 राम मंदिराबाबत केंद्र सरकारने धाडसी पाऊल उचलावं-उद्धव ठाकरे
3 Article 370: “गरज पडल्यास जम्मू काश्मीरचा दौरा करणार”, सरन्यायाधीशांचं मोठं वक्तव्य