पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान हे आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत राहिले आहेत. नुकतंच त्यांनी एका पाकिस्तानी वृत्त वाहिनीवर बोलताना महिलांवर होणाऱ्या बलात्काराविषयी आक्षेपार्ह विधान केलं होतं. त्यानंतर त्यांच्यावर पाकिस्तानमधूनही बरीच टीका झाली. त्यासोबतच सोशल मीडियावर देखील त्यांच्या विधानाचा समाचार घेण्यात आला. आता माजी जगविख्यात टेनिसपटू मार्टिना नवरातिलोवा हिने परखड शब्दांत इम्रान खान यांच्या विधानाचा समाचार घेतला आहे. “तुझ्या या विधानावर मोठा एफ यू मिळायला हवा इम्रान. तुला याहून बरंच चांगलं माहिती आहे. पण तुझी हीच लायकी आहे. लाज वाटायला हवी इम्रान”, असं ट्वीट मार्टिना नवरातिलोवानं केलं आहे. एकीकडे पाकिस्तान पंतप्रधान कार्यालयाकडून इम्रान खान यांच्या विधानाचा चुकीचा अर्थ काढल्याचं स्पष्टीकरण करण्यात आलेलं असताना त्यांच्या विधानाचा जगभरातील नेटिझन्स आणि काही सेलिब्रिटी समाचार घेताना दिसत आहेत.

नेमकं काय म्हणाले होते इम्रान खान?

इम्रान खान यांनी गेल्या आठवड्यात एका पाकिस्तानी वाहिनीवरच्या लाईव्ह शोमध्ये महिलांवरील अत्याचाराविषयी विचारण्यात आलेल्या प्रश्नावर हे वादग्रस्त विधान केलं होतं. “महिलांवरील लैंगिक अत्याचार हा पाश्चात्य देशांकडून आलेल्या अश्लीलतेचा परिणाम आहे. मुस्लिम संस्कृतीमध्ये ‘परदा’चं काय महत्त्व आहे? अशा प्रकारे लैंगकतेसाठी प्रवृत्त करणं टाळणं हाच त्याचा हेतू आहे. प्रत्येक पुरुषामध्ये तसं करण्याची इच्छा नसते. पण जर तुम्ही अशा प्रकारे अश्लीलता वाढवत गेलात, तर त्याचे परिणाम भोगावेच लागतील”, असं इम्रान खान म्हणाले होते. पेहेरावातून अश्लीलता वाढते, असा दावा इम्रान खान यांनी यावेळी केला होता.

 

निवृत्तीनंतर मार्टिना महिला सक्षमीकरणात कार्यरत

मात्र, त्यांच्या वक्तव्यावरून इतर नेटिझन्सप्रमाणेच मार्टिना नवरातिलोवा हिने देखील खरपूस शब्दांमध्ये टीका केली आहे. इम्रान खान हे स्वत: Oxford विद्यापीठात शिकलेले असून क्रिकेटपटू म्हणून त्यांनी जगभर प्रवास केला आहे. त्यामुळे जगभरातील संस्कृतींशी त्यांची ओळख झाली आहे. त्यामुळे त्यांच्याकडून अशा प्रकारचं विधान अनपेक्षित असल्याचंच मार्टिना नवरातिलोवा यांच्या “तुला याहून बरंच चांगलं माहिती आहे”, या विधानातून स्पष्ट होतंय. मार्टिना नवरातिलोवा २००६मध्ये आंतरराष्ट्रीय टेनिसमधून निवृत्त झाली. मात्र, तेव्हापासून LGBTQ समाज, महिलांचे हक्क, ब्लॅक लाईव्ह मॅटर अशा मुद्द्यांवरील सामाजिक कार्यात ती कार्यरत झाली आहे.

बलात्कारासाठी कपडे जबाबदार म्हणणाऱ्या इम्रान यांना पूर्वाश्रमीच्या पत्नीनं सुनावलं

याआधी देखील इम्रान खान यांनी ओसामा बिन लादेनला शहीद म्हणून वाद ओढवून घेतला होता. “मी हे कधीही विसरू शकणार नाही की पाकिस्तानी नागरिकांना किती शरम वाटली होती जेव्हा अमेरिकन अबोटाबादमध्ये आले आणि त्यांनी ओसामा बिन लादेनला मारलं, त्याला शहीद केलं”, असं इम्रान खान म्हणाले होते.