कोलकाता : पाकिस्तानला संवादाची एक संधी दिली पाहिजे, या भूमिकेचा पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या जवानाच्या विधवा पत्नीने गुरुवारी पुनरुच्चार केला. भारत व पाकिस्तानमध्ये शांततेचा पुरस्कार केल्याबद्दल तिला ‘ट्रोल’चा सामना करावा लागूनही तिने तिची भूमिका कायम ठेवली आहे.

मिता संत्रा हिचा पती बबलू संत्रा याचा पुलवामा येथील सीआरपीएफच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्यात शहीद झालेल्या ४० जवानांमध्ये समावेश होता.

युद्धाच्या विरोधात घेतलेल्या भूमिकेसाठी समाजमाध्यमांवर टीकेला तोंड द्यावे लागत असल्याची आपल्याला चिंता वाटत नसल्याचे मिता हिने सांगितले. युद्धात आणखी कितीतरी जास्त जीव जातील, त्यामुळे युद्धाऐवजी आपण संवादाला संधी द्यायला हवी, असे सांगून पाकिस्तानने पकडलेले भारतीय वैमानिक अभिनंदन वर्तमान यांना परत आणण्यासाठी सर्व प्रयत्न करण्याचे आवाहन तिने केंद्र सरकारला केले. पतीचा मृत्यू झाल्यानंतर सर्वत्र या आत्मघातकी हल्ल्याचा बदला घेण्याचे सूर उमटत असताना मिताने युद्धाच्या विरोधात जोरदार भूमिका घेतली होती. युद्ध झाल्यास सीमेच्या दोन्ही बाजूंना आणखी अनेक बळी जातील, स्त्रिया विधवा होतील, आयांना मुलांशिवाय आणि मुलांना वडिलांशिवाय राहावे लागेल असे सांगून तिने युद्ध टाळण्यास सांगितले.

‘ट्रोलची फिकीर नाही’

समाजमाध्यमांवरील ट्रोल माझ्या भूमिकेवर टीका करत असल्याची मला फिकीर वाटत नाही, कारण एका व्यक्तीने टीका केली तर इतर १० जणांनी माझ्या भूमिकेचे कौतुक केले आहे, असे मिता म्हणाली. ट्रोलनी तिच्या पतीवरील प्रेमावरच प्रश्नचिन्ह लावले.