हुतात्मा जवानाच्या पत्नीचे मनोगत

भारताने प्रत्यक्ष ताबा रेषा ओलांडून पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी छावण्यांवर केलेला हल्ला म्हणजे पाकिस्तानने उरी येथे केलेल्या हल्ल्याला दिलेले सडेतोड उत्तर आहे, असे पूँछ येथे ८ जानेवारी २०१३ मध्ये पाकिस्तानी सैनिकांनी शिरच्छेद केलेल्या हेमराज या भारतीय जवानाची वीरपत्नी धर्मावती हिने म्हटले आहे.

धर्मावती हिने सांगितले की, भारताच्या या सडेतोड उत्तरामुळे जवानांचा आत्मविश्वास वाढला आहे. पण हा हल्ला आधी केला असता तर उरी येथील सैनिकाचे प्राण गमावले गेले नसते. सरकारने पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांना दयामाया दाखवण्याची गरज नाही. लान्स नायक हेमराज यांचा पाकिस्तानी सैनिकांनी ८ जानेवारी २०१३ रोजी काश्मीरमधील पूँछ क्षेत्रात   शिरच्छेद केला होता. भारताने बुधवारी ताबा रेषा ओलांडून पाकव्याप्त काश्मीरमध्ये दहशतवादी छावण्यांवर निवडक हल्ले केले होते. उरी येथे पाकिस्तानच्या जैश ए महंमद या दहशतवादी संघटनेच्या दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात १९ जवान ठार झाले होते. त्यानंतर अकरा दिवसांनी भारताने बुधवारी पहाटे अचानक दहशतवादी छावण्यांवर कारवाई केली होती.

उरी हल्ल्यातील बळीसंख्या १९

नवी दिल्ली: उरी येथील लष्करी तळावर १२ दिवसांपूर्वीच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेला आणखी एक जवान शुक्रवारी मरण पावल्यामुळे या हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांची संख्या १९ झाली आहे. लष्कराच्या रिसर्च अँड रेफरल हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेला नायक राजकिशोर सिंग हा मरण पावल्याचे संरक्षण खात्याच्या सूत्रांनी सांगितले. तो बिहारच्या भोजपूर जिल्ह्य़ातीर आरा तालुक्यात असलेल्या पिपराटी खेडय़ाचा रहिवासी होता. पाकिस्तानमधून आलेल्या सशस्त्र दहशतवाद्यांनी १८ सप्टेंबरला उरीच्या लष्करी तळावर केलेल्या हल्ल्यात १८ सैनिक शहीद झाले होते. २८-२९ सप्टेंबरच्या मध्यरात्री पाकव्याप्त काश्मिरातील दहशतवाद्यांचे ७ तळ उद्ध्वस्त करून भारतीय सैन्याने त्याचा बदला घेतला आहे.