सोमवारी जम्मू-काश्मीरमध्ये पाकिस्तानी सैन्याच्या गोळीबारात भारताने दोन जवान गमावले. यामध्ये पंजाबच्या परमजीत सिंग यांचा समावेश आहे. परमजीत यांचे नातेवाईक आणि मित्र ही बातमी त्यांच्या पत्नी परमजीत यांच्यापासून लपवून ठेवू पाहात होते. परमजीत सिंग २८ एप्रिलला सुट्टी घेऊन घरी येणार होते. मात्र मित्राला सुट्टी हवी होती, म्हणून त्यांनी स्वत:ची सुट्टी केली. मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात सुट्टी घेऊन घरी परतण्याचा त्यांचा मानस होता. मात्र सोमवारी पाकिस्तानच्या गोळीबारात परमजीत सिंग यांना वीरमरण आले. मंगळवारी (आज) परमजीत यांचे पार्थिव तरन तारणमधील वेनपोईन गावी आणले जाणार आहे. परमजीत सिंग यांच्या मृतदेहाची पाकिस्तानी सैन्याकडून विटंबना करण्यात आली होती.

सोमवारी पत्नी परमजीत कौर यांना नातेवाईकांनी परमजीत सिंग दहशतवादी हल्ल्यात गंभीर जखमी झाल्याची माहिती दिली. ‘आम्ही अद्याप परमजीत सिंग यांच्या पत्नीला पती शहीद झाल्याचे सांगितलेले नाही. त्यांचे पार्थिव येईपर्यंत आम्ही परमजीत शहीद झाले असल्याचे सांगण्याचा प्रयत्न करु. मात्र परमजीत सिंग शहीद झाल्याची माहिती अनेकांना समजल्याने लोक घरी येऊ लागले आहेत. त्यामुळे त्यांच्या पत्नीपासून आता ही गोष्ट लपवणे आमच्यासाठी कठीण झाले आहे,’ अशा शब्दांमध्ये परमजीत यांचे नातेवाईक सतनाम सिंग यांनी त्यांच्या भावना बोलून दाखवल्या.

‘८ मे रोजी घरी परतेन, असे परमजीत सिंग यांनी सांगितले होते. याआधी ते ५ महिन्यांपूर्वी घरी आले होते. परमजीत यांना वीरमरण आल्याची माहिती मिळताच त्यांचे आई-वडिल अमृतसरमधील त्यांच्या नातेवाईकांकडे गेले. परमजीत सिंग यांचे वडिल शेतकरी आहेत. तर त्यांचे दोन भाऊ शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक कमिटीमध्ये काम करतात,’ अशी माहिती सतनाम यांनी दिली. परमजीत यांना तीन मुले आहेत. त्यांची मोठी मुलगी सिमरनजीत कौर दहावीत शिकते. याशिवाय त्यांना खुशदीप कौर आणि साहिलदीप सिंग ही दोन जुळी मुले आहेत.