पुँछ जिल्ह्यात पाकिस्तानी सैन्याने केलेल्या हल्ल्यात हुतात्मा झालेले नायब सुभेदार परमजीत सिंग यांच्यावर अखेर शोकाकुल वातावरणात अंत्यंसंस्कार करण्यात आले. तत्पूर्वी पत्नीने अंत्यसंस्कार करण्यास करण्यास नकार दिला होता. जोपर्यंत त्यांचे संपूर्ण शरीर मिळत नाही. तोपर्यंत अंत्यसंस्कार करणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते. हे पार्थिव कोणाचे आहे? आम्हाला त्यांचे पार्थिव दाखवले जात नाही, असं का? असा प्रश्न हुतात्मा परमजीत सिंग यांचे नातेवाईकांनी उपस्थित केला होता.

दरम्यान, परमजीत सिंग यांच्या पत्नीने पतीचा अभिमान असल्याचे म्हटले आहे. आपल्या मुलालाही सैन्य दलात भरती करणार असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले. सोमवारी पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन करत अचानक भारतीय चौकींवर रॉकेट लाँचर आणि गोळीबार केला होता. यामध्ये परमजीत सिंग आणि सीमा सुरक्षा दलाचे हेड कॉन्स्टेबल प्रेम सागर हुतात्मा झाले होते. पाक सैनिकांनी या दोघांच्याही मृतदेहाची विटंबना केली होती. याचा संपूर्ण देशभरात निषेध व्यक्त करण्यात येत आहे. मंगळवारी हुतात्मा परमजीत सिंग यांचे पार्थिव तरणतारण या गावी आणण्यात आले.

‘एबीपी न्यूज’ने दिलेल्या वृत्तानुसार हुतात्मा परमजीत सिंग यांच्या कुटुंबीयांना त्यांचे संपूर्ण पार्थिव हवे आहे. त्याशिवाय अंत्यसंस्कार करणार नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. परमजीत सिंग यांनी नुकतेच नवे घर बनवले होते. पण आता ते या घरात कधीच प्रवेश करणार नाहीत. आता त्यांचे पार्थिवच या घरात प्रवेश करेल, अशी खंत शहीद परमजीत सिंग यांचे भावाने व्यक्त केली होती.

पाकिस्तानी सैन्याच्या या भ्याड हल्ल्यात बलियाचे प्रेमसागरही हुतात्मा झाले होते. तत्पूर्वी त्यांच्या मुलीने आपल्या पित्याच्या बलिदाना बदल्यात पाकिस्तानी सैनिकांचे ‘शिर हवे असल्याचे म्हटले आहे.

जानेवारी महिन्यापासून आतापर्यंत पाकिस्तानने आतापर्यंत ६५ वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे. सोमवारी रात्री उशिरा भारतीय सैन्य दलानेही चोख प्रत्युत्तर दिले असून पाकच्या ७ सैनिकांचा खात्मा केल्याचे वृत्तही माध्यमात आले आहे. २०१३ मध्येही पाक सैनिकांनी मेंढर सेक्टरमध्ये एका भारतीय सैनिकाचे शिर कापले होते.