पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन करत केलेल्या गोळीबारात भारतीय लष्कराचे जवान लान्स नायक बख्तावर सिंग हे शुक्रवारी हुतात्मा झाले. जम्मू काश्मीरमधील नौशेरा सेक्टर येथे पाकने शस्त्रसंधीचे उल्लंघन केले होते. दरम्यान, हुतात्मा जवानाच्या कुटुंबीयाने मात्र केंद्र सरकारवर टीका केली आहे. पाकिस्तान सातत्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन करत आहे. पण सरकारकडून कडक कारवाई केली जात नसल्याबद्दल बख्तावर सिंगच्या वडिलांनी खंत व्यक्त केली आहे. आम्हाला आमच्या मुलाचा अभिमान आहे. त्याने देशासाठी प्राणाचा त्याग केला आहे. परंतु, सरकारच्या आळशीपणामुळे आम्ही दु:खी आहोत. पाकिस्तान सातत्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन करत आहे आणि आम्ही फक्त छोटे उत्तर देतो, अशा शब्दांत त्यांनी सरकारप्रती असलेली आपली नाराजी व्यक्त केली.

बख्तावरला दोन मुले आहेत. त्याच्या पत्नीला रोजगार मिळवून देण्यासाठी मदतीची गरज असल्याचे, बख्तावरच्या वडिलांनी म्हटले. गुरूवारी (दि. १५) पाकिस्तानी सैनिकांनी मोर्टार, रिकॉल गन्स आणि छोट्या हत्यारांच्या मदतीने शस़्त्रसंधीचे उल्लंघन केले होते. त्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यादरम्यान नौशेरा सेक्टर येथे नियंत्रण रेषेवर मोठ्याप्रमाणात गोळीबार झाला होता.

नौशेरा सेक्टरमध्ये गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानकडून सातत्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन होत आहे. दि. ११ जून रोजीही नियंत्रणरेषेवर पाकिस्तानी सैनिकांकडून गोळीबार करण्यात आला होता. पाकिस्तानी रेंजर्सनी जम्मू काश्मीरमधील सांबा जिल्ह्यातील आंतरराष्ट्रीय सीमेवर भारतीय चौक्यांवर अंदाधुंद गोळीबार केला होता. राजौरी जिल्ह्यातील नियंत्रण रेषेवरही पाकिस्तानी सैनिकांनी शस्त्रसंधीचे उल्लंघन केले होते. तर अनंतनाग जिल्ह्यातील अचबल येथे दबा धरून बसलेल्या दहशतवाद्यांनी एका पोलीस पथकावर हल्ला केला. यात ६ पोलीस हुतात्मा झाले होते.