आधुनिक काळाची गरज ओळखत देशातील सर्वात बडी कार उत्पादक कंपनी मारुति सुझुकी पहिली इलेक्ट्रिक कार पुढील महिन्यात सादर करणार आहे. फेब्रुवारीमध्ये दिल्लीत होणाऱ्या ऑटो एक्स्पोमध्ये ई-सर्व्हायव्हर ही कन्सेप्ट कार सादर करण्यात येणार असल्याचे मारुतिने बुधवारी जाहीर केले. इलेक्ट्रिक किंवा बॅटरीवर चालणाऱ्या या गाडीची संपूर्ण निर्मिती भारतात विकसित करण्याचा प्रयत्न असून यामध्ये सुट्या भागांचे उत्पादन, बॅटरी चार्ज करण्याची योजना आणि बॅटरींचा पुनर्वापर या बाबींचा समावेश असल्याचे कंपनीने म्हटले आहे.

ई-सर्व्हाव्हयर ही छत नसलेली किंवा ओपन टॉप प्रकारातील गाडी असून टू सीटर स्पोर्ट्स युटिलिटी वेहिकल आहे. भविष्याचा वेध घेणारी कार अशी या गाडीची कन्सेप्ट असून अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आल्याचा कंपनीचा दावा आहे. आणखी 12 वर्षांनी म्हणजे 2030 नंतर देशात केवळ इलेक्ट्रिक गाड्याच विकण्यात याव्यात असं महत्त्वाकांक्षी लक्ष्य भारत सरकारनं ठेवलं आहे. जर याला कार उत्पादकांनी पाठिंबा दिला नाही, तर आपण कार उत्पादकांशी बोलणार नाही तर बुलडोझर चालवू अशी धमकीच भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितिन गडकरी यांनी दिली होती. त्यामुळे अनेक कारउत्पादक गांभीर्याने ई-कार्सचा विचार करत असून मारुतिनं त्या दिशेने पाऊल उचलले आहे.

सुझुकी टोयोटा यांच्या भागीदारीमधून हे तंत्रज्ञान विकसित झाले असल्याचे कंपनीचे अध्यक्ष आर. सी. भार्गव यांनी सांगितले होते. कारण मारुतिकडे स्वत:चे असे ई-कारचे तंत्रज्ञान नाहीये. या कार्सचा वापर करता यावा यासाठी चार्जंगच्या पायाभूत सुविधा निर्माण करण्याचेही मारुतिने स्पष्ट केले आहे. त्यासाठी विदेशी भागिदाराची गरज नसून ते काम कंपनीच करू शकते असे भार्गव यांनी नमूद केले आहे. ई-सर्व्हायवर दिल्ली ऑटो एक्स्पोमध्ये सादर करण्यात येणार असून त्याचवेळी बहुप्रतिक्षित अशी संपूर्ण नूतनीतकरण केलेली स्विफ्टही सादर करण्यात येणार आहे.