जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अझर याच्यावरील र्निबधाचा भारताचा प्रस्ताव चीनने संयुक्त राष्ट्रांत रोखून धरला असला तरी अनेक देश प्रस्तावाच्या बाजूने उभे राहिले आहेत. मसूद अझरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित करण्याची मागणी फ्रान्सने केली आहे.

संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेने तयार केलेल्या दहशतवादी संघटनांच्या यादीत जैश-ए-मोहम्मद संघटनेचे नाव आहे. आता या संघटनेच्या म्होरक्याचेही नाव यादीत समाविष्ट करावे, अशी भारताची भूमिका रास्त आहे. त्यामुळेच फ्रान्सने या प्रस्तावाला पाठिंबा दिला असून सुरक्षा परिषदेत त्याचे जोरदार समर्थन केले, असे फ्रान्सचे परराष्ट्रमंत्री जीन-मार्क आयरॉल्ट यांनी सांगितले. ते नुकतेच चार दिवसांच्या भारतभेटीवर आले होते. मसूद अझर हा पठाणकोट हवाईतळावरील दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार आहे. त्याला आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित करण्याचा प्रस्ताव भारताने संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेच्या र्निबध समितीमध्ये फेब्रुवारी २०१६ मध्ये मांडला होता. त्यास चीनने खो घातला आहे.