Coronavirus चा परिणाम सगळ्या जगावर झाला आहे. जगातले अनेक देश करोना व्हायरसच्या दहशतीखाली आहेत. मात्र निसर्गावरही हा परिणाम झाल्याचं दिसतं आहे. थायलंडमध्ये माकडांनी रस्त्यावर उतरुन अक्षरशः दंगल माजवली आहे. करोना व्हायरसचा परिणाम विविध देशातल्या पर्यटनावर झाला आहे. थायलंडही त्याला अपवाद नाही.

थायलंडमध्ये हॉटेल्स, पर्यटन स्थळं ओस पडली आहेत. या देशातल्या माकडांनाही याची कल्पना आली असावी. कारण इथली माकडं रस्त्यावर उतरून दंगल माजवत आहेत. माकडांच्या टोळ्याच्या टोळ्या रस्त्यावरुन जाताना दिसत आहेत. समजा कुणी खाऊचं एखादं पाकीट जरी टाकलं तर त्यावर एकदम ३०/४० माकडं तुटून पडत आहेत. थायलंडच्या रस्त्यांवर सध्या असंच चित्र दिसून येतं आहे. द गार्डिअनने या संदर्भातलं वृत्त दिलं आहे. या संदर्भातला व्हिडीओ पाहिला तरीही आपल्या ही बाब लक्षात येते.

पाहा व्हिडीओ

सध्या उन्हाळा आहे. त्यामुळे या ठिकाणी भेट द्यायला शेकडो पर्यटक येतात. मात्र सध्या रस्त्यांवर, हॉटेल्समध्ये शुकशुकाट आहे. देशातल्या अनेक नागरिकांनाही करोनच्या भीतीने देश सोडून दुसऱ्या ठिकाणी जाणं पसंत केलं आहे. त्यामुळे रस्ते, हॉटेल्स, पर्यटन स्थळं ओस पडली आहेत. या सगळ्यामुळे हजारो माकडं रस्त्यावर उतरली आहेत. या माकडांनी रस्ताच ताब्यात घेतला आहे असं दिसून येतं आहे.

रस्त्यावर उतरलेली ही माकडं घरांमध्ये, दुकानांमध्ये शिरत आहेत. तिथलं अन्न, खाद्यपदार्थांची पाकिटं पळवत आहेत. करोनाचा परिणाम या देशातील पर्यटनावर झाला आहे. या देशाची अर्थव्यवस्था पर्यटनावर अवलंबून आहे. त्यामुळे या देशाच्या अर्थव्यवस्थेवरही परिणाम झाला आहे. अशात आता माकडांची रस्त्यावरची दंगल हे रोजचेच चित्र झाले आहे.