देशाच्या विविध भागांत पडलेल्या दुष्काळाच्या पाश्र्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी जलसंवर्धन आणि साठा करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करण्याचे सूचित केले. येत्या काही महिन्यांत मनरेगा योजनेखाली प्रयत्न करण्यात येणार असून त्यामध्ये एनसीसीसारख्या युवकांच्या संघटनांनी सहभागी व्हावे, असे आवाहनही मोदी यांनी केले.
एनएसएस, एनसीसी, भारत स्काऊट्स अ‍ॅण्ड गाइड्स, इंडियन रेड क्रॉस सोसायटी आणि एनवायकेएस यांच्या कारभाराचा आढावा घेताना मोदी यांनी या गटांमध्ये योग्य समन्वय असणे गरजेचे असल्याचे सांगितले.
येत्या काही महिन्यांत मनरेगा योजनेअंतर्गत मोठय़ा प्रमाणावर जलसंवर्धन आणि साठा करण्याच्या यंत्रणेबाबत प्रयत्न करण्यात येणार असून या संघटनांनी त्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावावी, असे आवाहन मोदी यांनी केले.
या वेळी युवक सघटनांच्या प्रतिनिधींनी आपल्या संघटनेच्या कारभाराची माहिती मोदी यांना दिली तेव्हा मोदी यांनीही त्यामध्ये काही सूचना केल्या. समाजमाध्यमांवर कार्यरत राहून युवकांशी जास्तीत जास्त संपर्क ठेवण्याचे आवाहनही मोदी यांनी केले.