दार्जिलिंग जिल्ह्य़ातील उपविभागात काल रात्री जोरदार पावसामुळे दरडी कोसळून किमान ३८ जण ठार झाले असून अनेक जण बेपत्ता आहेत. मृतांची संख्या वाढण्याची शक्यता असून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी घटनास्थळी रवाना झाल्या आहेत.
दार्जिलिंग, कालिमपाँग व क्युरसेआँग या उपविभागात २५ ठिकाणी दरडी कोसळल्या असून राष्ट्रीय महामार्ग १० व राष्ट्रीय महामार्ग ५५ येथे मोठे नुकसान झाले आहे, त्यांचा बाकी भागाशी संपर्क तुटला आहे. सहस्र सीमा दलाचे जवान व लष्कर तेथे मदत कार्य करीत आहे. कालिमपाँग येथे या दुर्घटनेत २० जण जखमी झाले असून १५ जण बेपत्ता झाले आहेत. आपत्कालीन व्यवस्थापनमंत्री जावेद खान यांनी कोलकाता येथे सांगितले, की या घटनांमध्ये २२ जण मरण पावले आहेत. सीमा रस्ता संघटनेचे लोक रस्त्यावरील दगड हटवत आहेत. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या मुर्शिदाबाद जिल्ह्य़ात असून त्या घटनास्थळी रवाना झाल्या आहेत. गृह सचिवांना तिकडे पाठवण्यात आले आहे. उत्तर बंगाल विकासमंत्री गौतम देव यांनी सांगितले, की लष्कराची मदत मागवण्यात आली असून मदत कार्य सुरू आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दरडी कोसळण्याचे २५ प्रकार घडले असून राष्ट्रीय महामार्ग १० वर मोठा फटका बसला आहे त्यामुळे कालिमपाँग, लावा, लोलेगाव व गारूबथन यांचा संपर्क तुटला आहे. राष्ट्रीय महामार्ग ५५ हा सिलिगुडी व मातिगारा या ठिकाणांना दार्जिलिंगशी जोडतो, मिंक व रोहिणी भागात हा रस्ता उखडला आहे व तेथे दरडीही कोसळल्या आहेत. मिरिक येथे १० जणांचा मृत्यू झाला असून कालिमपाँग येथे सात तर सुकियापोखरी येथे एकाचा मृत्यू झाला. सविस्तर माहिती अजून मिळालेली नाही.