आठवडाभरापूर्वी धावत्या बसमध्ये २३ वर्षीय तरुणीवर झालेला बलात्कार आणि त्यापाठोपाठ गेल्या दोन-तीन दिवसांत राजधानीत घडलेल्या महिला अत्याचाराच्या घटना या सर्वामुळे दिल्लीकरांत उसळलेल्या संतापाचा भडका शनिवारी उडाला. सामूहिक बलात्काराच्या घटनेचा निषेध करण्यासाठी आणि आरोपींना फाशी देण्याची मागणी करत हजारो तरुण-तरुणींचा जमाव राष्ट्रपती भवन व संसद भवनावर चालून आला. राष्ट्रपती भवन, संसद भवन, पंतप्रधानांचे कार्यालय अशी अतिमहत्त्वाची ठिकाणे असलेल्या या परिसराला शनिवारी सकाळपासूनच आंदोलकांनी वेढा घातल्याने सुरक्षा यंत्रणांची पंचाईत झाली. अश्रूधुर, लाठीमार आणि पाण्याच्या फवाऱ्यांचा वापर करूनही आंदोलकांचा प्रक्षोभ थोपवणे पोलीस व सुरक्षा बलांना जमले नाही. या वेळी झालेल्या दगडफेक, लाठीमारात ३० हून अधिक आंदोलक आणि अनेक पोलीस जखमी झाले. पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनीही या घटनेची गंभीर दखल घेत केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांना महिलांच्या सुरक्षेबाबत तातडीने कडक उपाययोजना राबवण्याचे आदेश दिले.