मानवी शरीरात प्रत्यारोपण करण्यासाठी कृत्रिम यकृत तयार करण्याच्या प्रयोगात वैज्ञानिकांना मोठे यश आले असून या संशोधनात एका भारतीय वैज्ञानिकाचाही समावेश आहे.यकृताच्या वृद्धी क्षमतेचा वापर करून कृत्रिम यकृताच्या उती तयार करता येऊ शकतात पण त्यात आतापर्यंत यश आले नव्हते. परिपक्व यकृत पेशी म्हणजे हेपॅटोसायइट्स या शरीरातून बाहेर काढल्यानंतर लगेचच त्यांचे कार्य बंद करतात. मॅसॅच्युसेट्स इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी या नामांकित संस्थेत काम करणाऱ्या अभियंता संगीता भाटिया यांच्या मते यकृत जर त्याचा काही भाग कापला तरी पुन्हा वाढते. यकृताच्या पेशी या वृद्धीस अनुकूल असतात पण काहीवेळा त्या शरीराबाहेर काढल्यानंतर या गुणधर्मास खऱ्या उतरत नाहीत.
भाटिया व त्यांच्या सहकाऱ्यांनी अशी काही रासायनिक संयुगे शोधून काढली आहेत ज्यांच्यामुळे यकृताच्या पेशी शरीराबाहेर प्रयोगशाळेतही विकसित होतात तसेच त्यांची संख्याही वाढत जाते. अशा प्रकारे वाढवलेल्या पेशी या यकृताच्या सुनियंत्रित उती तयार करण्यासाठी वापरता येऊ शकतात व त्यामुळे हेपॅटिटिस सी यासह अनेक यकृत विकारांनी त्रस्त असलेल्या जगातील पन्नास कोटी लोकांना त्याचा फायदा होऊ शकतो.
संशोधकांनी यात अशी पद्धत वापरली आहे की, ज्यात यकृताच्या पेशी या थरांमध्ये फायब्रोब्लास्टसमवेत वाढतात. त्यातून यकृताच्या पेशीला वाढण्यासाठी व तिचे कार्य कायम राहण्यासाठी जी १२५०० विविध रसायने आवश्यक असतात त्यांचा अभ्यास शक्य झाला. संशोधकांनी यकृतातील ८३ वितंचकांची यातील भूमिका यात तपासली. यापुढे एमआयटीचे पथक अशा प्रकारच्या सुनियंत्रित यकृत पेशी पॉलिमर उतींच्या साच्यात टाकून त्यांचे उंदरांमध्ये प्रत्यारोपण करण्याच्या विचारात आहेत. रुग्णाच्या यकृत पेशींची शरीराबाहेर वाढ करता येईल अशा प्रकारची संयुगे औषधांच्या रूपात आणण्याचे त्यांचे प्रयत्न आहेत.
फायदा काय?
या यकृताच्या सुनियंत्रित उती तयार करण्यासाठी वापरता येऊ शकतात व त्यामुळे हेपॅटिटिस सी यासह अनेक यकृत विकारांनी त्रस्त असलेल्या जगातील पन्नास कोटी लोकांना त्याचा फायदा होऊ शकतो.