जम्मू-काश्मीरमधील अतिरेक्यांना अर्थसहाय्य करणारं मोठं रॅकेट पोलिसांनी गुरुवारी कारवाईत उध्वस्त केलं आहे. कुपवाडा भागात केलेल्या कारवाईत लष्कर-ए-तोयबाचे ३ एजंट पोलिसांच्या जाळ्यात सापडले असून, पोलिसांनी कोट्यवधी रुपयांची रक्कम आणि अमली पदार्थांचा साठा जप्त केला आहे. अटक करण्यात आलेले ३ एजंट हे पाकिस्तानमधील लष्करच्या बड्या अधिकाऱ्यांनी संपर्कात असल्याची माहिती, हंदवाडाचे पोलीस अधिक्षक डॉ. जी.व्ही. संदीप चक्रवर्ती यांनी दिली.

पोलिसांनी या कारवाईत २१ किलो हेरॉईन आणि १.३४ कोटी रुपये असा मुद्देमाल जप्त केला आहे. जम्मू-काश्मीर भागात अमली पदार्थ विकून लष्करच्या अतिरेक्यांना अर्थसहाय्य करण्याचं काम अटकेत असलेले ३ एजंट करत होते अशी माहिती पोलिसांनी दिली. आतापर्यंत जम्मू-काश्मीर पोलिसांची ही सर्वात मोठी कारवाी मानली जातेय.

अटकेत असलेल्या ३ आरोपींपैकी एका व्यक्तीचं नाव इफ्तिकार इंद्राबी असून, जम्मू-काश्मीर भागात ड्रग्ज तस्करी करण्यात या व्यक्तीचा मोठा वाटा असल्याचं पोलिसांनी सांगितली. इतर दोन आरोपींची नावं मोमीन पीर आणि इक्बाल अस्लम अशी आहेत. तिन्ही आरोपींविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे.