अमेरिकेतील ओक्लाहोमा शहराला चक्रीवादळाचा जोरदार तडाखा बसला असून त्यामध्ये २० लहान मुलांसह ९० हून अधिक जण ठार झाले आहेत. चक्रीवादळामुळे नजीकच्या परिसराचेही अतोनात नुकसान झाले असून दोन प्राथमिक शाळा कोसळल्या आहेत. चक्रीवादळामुळे या परिसराला युद्धभूमीचे स्वरूप आले आहे.
जवळपास ताशी ३२० कि.मी. वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे दक्षिणेकडील मूर शहराला त्याचा मोठा फटका बसला आहे. त्याच ठिकाणी असलेल्या दोन प्राथमिक शाळा चक्रीवादळाच्या तडाख्याने कोसळल्या आहेत. चक्रीवादळाच्या तडाख्यात आतापर्यंत ९१ जण ठार झाल्याचे वृत्त असून मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.
शहरातील दोन रुग्णालयांमध्ये १४५ जणांवर उपचार सुरू असून त्यामध्ये ७० मुलांचा समावेश आहे. या वादळाच्या तडाख्यात नक्की किती जण दगावले त्याचा निश्चित आकडा सध्या सांगता येणे कठीण आहे, कारण अद्यापही अनेक ठिकाणी शोधसत्र सुरू आहे. मात्र अधिकाऱ्यांनी हे भीषण वादळ असल्याचे म्हटले आहे. जवळपास ४० मिनिटे हे चक्रीवादळ जमिनीवर घोंघावत होते आणि ३२ कि.मी.चा परिसर त्याने व्यापला होता.या चक्रीवादळाने गेल्या ३६ तासांत परिसरातील अनेक घरे आणि इमारती जमीनदोस्त झाल्या.
आपल्या मुलांचा ठावठिकाणा न लागलेल्या पालकांना किती वेदना होत असतील त्याच्या कल्पनेनेच आमच्या हृदयाची धडधड वाढली आहे, असे गव्हर्नर मेरी फॅलीन म्हणाल्या. अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी ओक्लाहोमामध्ये आणीबाणी जाहीर केली असून तिथे तातडीने मदत पाठविली आहे. फॅलीन यांनी मदतकार्य पथकाला सहकार्य करण्यासाठी ८० नॅशनल गार्ड पाठविले आहेत.
वादळाचा तडाखा बसलेल्या परिसरातील प्रत्येक घरात जाऊन तपासणी करण्यात येत आहे. आणीबाणी व्यवस्थापन विभागाचेअधिकारी अहोरात्र कार्य करीत असून दोन प्राथमिक शाळा कोसळल्या त्यामध्ये किती विद्यार्थी होते त्याचा तपशील कळू शकलेला नाही.
मूर परिसराला १९९९ नंतर बसलेला चक्रीवादळाचा हा मोठा तडाखा आहे. १९९९ मध्ये बसलेल्या तडाख्यात ३६ जण ठार झाले होते.