25 November 2020

News Flash

मध्य भारतातील पावसाच्या अचूक अंदाजासाठी गणिती प्रारूप

संशोधकांनी गणिती प्रारूपावर आधारित नवीन पद्धती तयार केल्या

| July 17, 2016 01:59 am

मध्य भारतातील पावसाचा अंदाज अधिक अचूकपणे देण्यासाठी संशोधकांनी गणिती प्रारूपावर आधारित नवीन पद्धती तयार केल्या असून, तेथे जास्त पाऊस किंवा दुष्काळ अशा टोकाच्या स्थिती निर्माण होतात, त्यामुळे राष्ट्रीय व जागतिक अर्थव्यवस्थेवर परिणाम होतो. ब्रिटनमधील डेक्स्टर विद्यापीठाच्या वैज्ञानिक इंद्राणी रॉय यांच्यासह काही वैज्ञानिकांनी २३ गणितीय प्रारूपांचा अभ्यास केला असून, त्यांच्या मदतीने हवामानाचा अंदाज करता येतो. या अंदाजाची हवामानाच्या मानवी निरीक्षणांशी तुलना करण्यात आली असता गणितीय प्रारूपाने केलेले अंदाज योग्य असल्याचे दिसून आले आहे. मध्य व ईशान्य भारतात हे अंदाज खरे ठरले आहेत. उष्णकटिबंधीय प्रशांत महासागरातील स्थितीच्या मदतीने मध्य व ईशान्य भारतातील मान्सूनचा अंदाज करता येतो. पण या गणितीय प्रारूपांच्या मदतीने भारताच्या इतर भागातील मान्सूनबाबत अंदाज करता येत नाही. भारत हा जास्त लोकसंख्येचा देश असून, येथील मान्सूनचा देशाच्याच नव्हे तर जगाच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होत असतो, असे रॉय यांनी म्हटले आहे. आमच्या निष्कर्षांमुळे हवामान अंदाजाची कौशल्ये सुधारतील त्यामुळे शेती व अन्य क्षेत्रात फायदा होऊन आर्थिक भरभराट होईल व संपत्तीची निर्मिती होईल व त्यामुळे उपखंडाच्या हवामान अंदाजाच्या क्षमतेत मोठा फरक होऊन बदल करता येईल. मान्सूनचा शेतीवर मोठा परिणाम होत असतो व शेतीवर भारताची अर्थव्यवस्था अवलंबून आहे, त्यामुळे हवामान अंदाज महत्त्वाचे ठरतात. भारतातील ८० टक्के पाऊस हा नैर्ऋत्य मोसमी असतो व आवश्यक पिकांसाठी शेतकरी त्यावर अवलंबून असतो. काही वेळा पूरही येतात, त्यामुळे मानवी हानी होते. २००५ मध्ये मान्सूनने हजार बळी घेतले होते. जास्त अचूक हवामान अंदाजामुळे शेतकऱ्यांना पिकांची निवड व नियोजन योग्य प्रकारे करता येते व शेतकऱ्यांबरोबरच धोरणकर्त्यांनाही जादाचे पाणी साठवण्यासाठी धोरणे आखणे सोपे जाते. भारतीय मान्सूनला एल निनो परिणामाचा फटका बसत असतो. या परिणामात कटिबंधीय प्रशांत महासागरात मध्य ते पूर्व भागात सागरी पृष्ठीय तापमानात बदल होत असतात. एल निनो व ला निना हे परस्परविरुद्ध परिणाम असून, ला निनामुळे सागरी पृष्ठीय तापमान कमी होते, तर एल निनोमुळे वाढत असते. एल निनोमुळे मान्सूनचा पाऊस कमी पडतो, तर ला निनामुळे जास्त पाऊस पडतो, असे संशोधकांचे म्हणणे आहे. आताच्या संशोधनातून सरकार व धोरणकर्त्यांना निर्णय घेण्यात व समाज, शेतकरी व उद्योजकांचे नैसर्गिक आपत्तींच्या परिणामांपासून रक्षण करण्यात यश येऊ शकेल. इंटरनॅशनल जर्नल ऑफ क्लायमॅटॉलॉजी या नियतकालिकात हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 17, 2016 1:59 am

Web Title: mathematical models for accurate prediction of rain
Next Stories
1 जीएसटीने १४ हजार कोटींचा फटका
2 मुख्यमंत्री बदलून काँग्रेसने अरुणाचल प्रदेश राखले
3 केंद्र-राज्ये यांच्यात गुप्तचर माहितीची देवाणघेवाण हवी
Just Now!
X