मथुरा येथे हिंसाचारात २१ जणांचा बळी गेला असताना अशा गंभीर घटनेवेळी या मतदार संघाच्या खासदार हेमा मालिनी मात्र ट्विटवर आपल्या चित्रीकरणाची छायाचित्रे ट्विट करण्यात व्यस्त होत्या. हेमा मालिनी यांच्या कृत्याचा ट्विटरकरांनी चांगला समाचार घेतला. मथुरा हा हेमा मालिनी यांचा मतदार संघ आहे. २०१४ साली मतदारांनी हेमा मालिनी यांना निवडून दिले. स्वत:च्या मतदार संघात इतकी गंभीर घटना घडत असताना लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्याची गरज होती. पण हेमा मालिनी यांनी आपल्या आगामी चित्रपटाच्या चित्रीकरणावेळीचे बोटीतून प्रवास करत असतानाची छायाचित्रे टाकून जनतेचा रोष ओढावून घेतला.

मथुरा हिंसाचारात २४ जणांचा बळी, घटनास्थळी सापडली शस्त्रास्त्रे आणि काडतुसे 

हेमा मालिनी यांनी आपल्या ‘एक थी राणी’ या आगामी चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्याची मुंबईतील मड येथील समुद्रातून बोटीतून प्रवास करतानाची छायाचित्रे सोशल मीडियावर शेअर केली. मथुरेत हिंसाचार सुरू असताना या मतदार संघाचा खासदार मात्र चित्रीकरणात व्सस्त असल्याची टीका सोशल मीडियावर सुरू झाली. त्यानंतर हेमा मालिनी यांनी सावध पवित्रा घेत ट्विटरवर शेअर केलेली छायाचित्रे काढून टाकली.
मथुरेतील एका बागेतील अतिक्रमण हटवताना तेथील आंदोलक आणि पोलीसांमध्ये झालेल्या गोळीबारात जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक, पोलीस उपनिरीक्षक यांच्यासह २४ जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये २२ आंदोलकांचा समावेश आहे.