उत्तर प्रदेशातील मथुरा येथील एका मंदिराच्या परिसरात काही लोकांनी नमाज पठण केल्याचा प्रकार समोर आला आहे. सोशल मीडियातून याचे फोटो व्हायरल झाल्याने याची सर्वत्र चर्चा सुरु होती. दरम्यान, पोलिसांनी चार जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

मथुरेतील जनपद भागातील नंदगावमधील नंदबाब मंदिराच्या परिसरात हा प्रकार घडला आहे. मंदिरातील दोन सेवेकऱ्यांच्या तक्रारीवरुन चार तरुणांविरोधात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या सेवेकऱ्यांनी नमाज पठण करणाऱ्या तरुणांमागे विदेशी संघटनांचा हात असल्याची शंका व्यक्त केली आहे. त्याचबरोबर विदेशी फंडिंगच्या चौकशीची मागणीही केली आहे. दिल्लीहून आलेल्या या दोन तरुणांनी या मंदिराच्या परिसरात नमाज पठण केले होते. याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाले आहेत.

मंदिराचे सेवेकरी मुकेश गोस्वामी आणि शिवहरी गोस्वामी यांनी रविवारी संध्याकाळी म्हटलं की, “२९ ऑक्टोबर रोजी दुपारी साडेबारा वाजता नंदबाबा मंदिरात काही प्रवासी आहे होते. यामध्ये दिल्लीच्या एका संस्थेचे सदस्य फैजल खान, मोहम्मद चांद, आलोक रतन आणि नीलेश गुप्ता हे होते.”

दरम्यान, याप्रकरणी असा आरोप केला जात आहे की, “फैजल आणि मोहम्मद चांद यांनी सेवेकऱ्यांची परवानगी न घेताच मंदिराच्या परिसरात नमाज पठण केले आणि आपल्या सहकार्यांकडून फोटो काढून ते सोशल मीडियावर टाकले. त्यांच्या या कृत्यामुळे हिंदू समाजामध्ये रोष निर्माण झाल्याचे सांगण्यात येत आहे.

“इथल्या मातीत प्रेम आहे, चुकीच्या कारणासाठी कृत्य केलं नाही”

फैजल खान आणि मोहम्मद चांद यांनी आलोक आणि नीलेश यांच्यासोबत श्रीकृष्णाच्या कुटुंबाचे दर्शन घेतले. फैजल खानने सांगितलं की, ते सर्वजण ब्रज ८४ यात्रेसाठी सायकलवरुन निघाले आहेत. यावेळी फैजलने तिथे उपस्थित लोकांना रामचरित मानस ही ऐकवलं. धर्म प्रेम आहे, ब्रजच्या मातीत आम्ही प्रेम अनुभवलंय. दिवाळीला आम्ही श्रीरामाच्या नावाच्या पणत्याही लावणार आहोत, असंही त्यांनी म्हटलं आहे. त्याचबरोबर मंदिराचे सेवेकऱ्यांनीही सांगितंल की या चौघांनाही त्यांनी मंदिरातील प्रसाद दिला. फैजल खान यांना हिंदू धार्मिक ग्रंथांचे चांगले ज्ञान आहे, मात्र नमाजसाठी त्यांनी आमची परवानगी घेतली नाही, हीच त्यांनी चूक केली.