भारत-पाकिस्तान यांनी आता व्यापार व इतर क्षेत्रात सहकार्य सुरू करण्यासाठी अधिक प्रगल्भता व आत्मविश्वास दाखवण्याची गरज आहे, आपल्याकडून बदलाची अपेक्षा असताना जगाला निराश करून चालणार नाही, पाकिस्तानने त्यांना सुसाध्य होईल अशा पद्धतीने सहकार्याच्या दिशेने पावले उचलावीत, असे परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी येथे सांगितले. एक प्रकारे भारताच्या वतीने त्यांनी पाकिस्तानला मैत्रीचा संदेश दिला आहे.

हार्ट ऑफ आशिया मंत्रिपातळीवरील परिषदेत स्वराज यांनी उभय देशांमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी व्यापक पातळीवर संवादाची आवश्यकता व्यक्त केली.
आंतरराष्ट्रीय समुदायाने दहशतवादी व अतिरेकी यांना आश्रयस्थान मिळणार नाही यासाठी प्रयत्न करावेत. अफगाणिस्तान यादवीग्रस्त आहे, दूरसंचार-ऊर्जा-व्यापार या क्षेत्रात त्या देशाशी सहकार्य सुरू करण्याची गरज आहे. या निमित्ताने आम्ही पाकिस्तानकडे आमचा मैत्रीचा हात देत आहोत, अधिक समजूतदारपणा दाखवून आत्मविश्वासाने व्यापार व सहकार्य वाढवले पाहिजे. सर्व जग भारत-पाकिस्तान संबंधात बदलाची अपेक्षा करीत असताना आपण आंतरराष्ट्रीय समुदायाला निराश करून चालणार नाही, असे त्या म्हणाल्या.
स्वराज यांच्यासमवेत परराष्ट्र सचिव एस. जयशंकर, भारताचे उच्चायुक्त टीसीए राघवन व अफगाणिस्तानातील दूत अमर सिन्हा आहेत.
स्वराज यांनी सांगितले की, अफगाणिस्तानात दहशतवादाची तीव्रता वाढली आहे, त्याची व्यापकता वाढली आहे. भारत अफगाणिस्तानला संरक्षण क्षमता वाढवण्यासाठी मदत करण्यास तयार आहे.
अफगाणिस्तानच्या शेजारी देशांनी दहशतवाद्यांना अभय देता कामा नये ती आपली जबाबदारी आहे.

पाकिस्तान भेटीवर आलेल्या भारताच्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी ‘हार्ट ऑफ पीस’ या परिषदेच्या निमित्ताने पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांची भेट घेतली.