गुजरातमधील गीर अभयारण्यातील सुप्रसिद्ध आणि आशियाची शान असलेल्या ‘मौलाना’ सिंहाचा बुधवारी मृत्यू झाला. गेल्या दहा वर्षांपासून त्याच्यावर उपचार सुरू होते. गुजरातच्या पर्यटन विभागाच्या जाहिरातीत सुपरस्टार अमिताभसोबत तो झळकला होता.

गुजरात पर्यटन विभागाच्या ‘खुशबू गुजरात की’ या जाहिरातीत गीर अभयारण्यातील सिंहांचे चित्रण करण्यात आले होते. या जाहिरातीत मौलानाही होता. गीर अभयारण्यातील सर्वात वयस्कर (१६वर्षे) सिंह होता. गेल्या दहा वर्षांपासून त्याच्यावर उपचार सुरू होते. अभयारण्यात फिरत असताना तो मौलानासारखा दिसायचा. म्हणून त्याला मौलाना नावाने ओळखले जात होते, असे वनविभागाचे प्रमुख सिंह यांनी सांगितले.

२०१० साली सुपरस्टार अमिताभ बच्चन गीर अभयारण्यात शुटींगसाठी आले होते. त्यावेळी मौलानाला त्यांनी पाहिले. त्याला पाहताच अमिताभ त्याच्या प्रेमात पडले. त्यांनी या सिंहाचे वर्णन आपल्या ब्लॉगमध्येही केले होते. फक्त एक नव्हे तर अनेक सिंह…ते येत आहेत. ३…४…एकूण ७ सिंह आहेत. त्यांचा म्होरक्या एक नर सिंह आहे, असे त्यांनी आपल्या ब्लॉगमध्ये लिहिले होते.