कानपूरच्या मुस्लीम प्राध्यापकाला मृत्यूनंतर अवयव दान करण्याची घोषणा महागात पडली आहे. कारण त्यांनी ही घोषणा करताच या विरोधात फतवा काढून त्यांचा छळ सुरु करण्यात आला. इस्लाम धर्मात अवयव दान मंजूर नाही असे सांगत हा फतवा काढण्यात आला. कानपूरचे अर्शद मंसूरी हे दंत महाविद्यालयात प्राध्यापक आहेत. त्यांनी असे म्हटले आहे की, खरेतर माणुसकीच्या दृष्टीने मी ही घोषणा केली होती तसेच मुस्लीम बांधवांनी अवयव दानासाठी पुढे यावे असे आवाहनही केले होते. मात्र माझ्या विरोधात फतवा काढला गेला असून मला मानसिक त्रास देण्यास सुरुवात झाली आहे असा आरोप त्यांनी केला.

मी अवयव दानासंदर्भात घोषणा केल्यानंतर आणि मुस्लीम बांधवांना तसे आवाहन केल्यानंतर मला अनोळखी क्रमांकावरून फोन आले. हे सगळे फोन धमकी देणारे होते. मी याविरोधात कानपूर पोलीस ठाण्यात तक्रारही केली मात्र पोलिसांनी काहीही कारवाई केलेली नाही असेही प्राध्यापक मंसूरी यांनी म्हटले आहे. मौलाना हनीफ बरकतींनी माझ्याविरोधात फतवा काढला मात्र माझ्या मते त्यांचे विचारच भ्रष्ट आहेत. मला धर्मातून बहिष्कृत करण्याचीही धमकी देण्यात आली आहे. मात्र माणुसकीच्या दृष्टीने विचार केला तर अवयव दान हे श्रेष्ठ दान आहे. मी अजूनही माझ्या मतावर ठाम आहे असेही मंसूरी यांनी एएनआय या वृत्तसंस्थेला सांगितले.

प्राध्यापक मंसूरी यांनी अवयव दान इस्लाम धर्मात मंजूर आहे की नाही हे मला विचारले होते. मी त्वरित त्यांना सांगितले की अवयव दान इस्लाम धर्मात निषिद्ध मानले गेले आहे. अल्लाह ने सांगितले आहे त्याचे पालन न केल्यास तो माणूस मुस्लीम आहे की नाही याबाबत संशय निर्माण होण्यास जागा आहे अशी प्रतिक्रिया मौलाना हनीफ बरकती यांनी दिली.