जगभरात हिंदी भाषेचा प्रसार व्हावा यासाठी शनिवारपासून मॉरिशसची राजधानी पोर्ट लुईस येथे विश्व हिंदी संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या संमेलनात भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. याशिवाय मॉरीशसचे पंतप्रधान प्रवीण कुमार जगन्नाथ यांनी ज्या सायबर टॉवरच्या निर्मीतीमध्ये वाजपेयींनी सहकार्य केलं होतं, त्या सायबर टॉवरला ‘अटल बिहारी वाजपेयी’ नाव देण्याची घोषणा केली.

संमेलनाच्या सुरूवातीला दोन मिनिट मौन धारण करुन वाजपेयींना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी भारताच्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यादेखील उपस्थित होत्या. संमेलनात भारतीय नेत्यांसह जगभरातील विविध देशांचे नेत्यांनीही भाग घेतला. यापूर्वी वाजपेयींचा सन्मान म्हणून मॉरीशसने त्यांचा राष्ट्रध्वजही खाली घेतला होता.

हिंदी संमेलनात सहभागी होण्यासाठी जवळपास २९० अधिकारी लुईस पोर्टवर दाखल झाले होते. देशातील २९ राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचे प्रतिनिधींनी या संमेलनात पहिल्यांदाच भाग घेतला आहे. हे संमेलन ३ दिवस चालणार आहे. दरम्यान, या संमेलनात विविध हिंदी आणि भारतीय संस्कृतीवरील ८ विषयांवर चर्चा होणार आहे. पंतप्रधान मोदींनी संमेलनासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.