सरकारने मदत केली नाही तर सहा महिन्यात ३० टक्के दुकानं बंद होतील असं वक्तव्य रिटेलर्स असोसिएशन ऑफ इंडियाचे सीईओ राजगोपालन यांनी केलं आहे. घाऊक आणि किरकोळ विक्री करणाऱ्यांपैकी किरकोळ विक्री करणाऱ्यांवर फेब्रुवारीपासूनच संकट आलं आहे. अशात आता करोनाच्या संकटामुळे किरकोळ व्यवसाय करणाऱ्या दुकानदारांवर टाच येण्याची शक्यता आहे. गेल्या महिन्यात हा कारभार ६० टक्क्यांपर्यंत होता. आता मार्चमध्ये हा कारभारातली उलाढाल शून्यावर आली आहे. त्यामुळेच ही शक्यता वर्तवण्यात आली आहे. एका हिंदी वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी ३० टक्के दुकानं सहा महिन्यात बंद होतील अशी शक्यता वर्तवली आहे.

सध्याची परिस्थिती अत्यंत वाईट आहे. त्यामुळे पुढे रिटेल दुकानदारांच्या अडचणी आणखी वाढणार आहेत असंही राजगोपालन यांनी म्हटलं आहे. सध्या रिटेल दुकानदार यांचे ८५ टक्के खर्च ठरलेले आहेत. जर या सगळ्या परिस्थितीत सरकारने हस्तक्षेप केला नाही तर ३० टक्के किरकोळ व्यावसायिकांची दुकानं येत्या सहा महिन्यात बंद होतील.

सध्या देशात करोनाचं संकट देशावर घोंघावत आहे. त्यामुळे करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देश लॉकडाउन करण्यात आला आहे. अत्यावश्यक सेवा वगळल्या तर बाकीच्या सगळ्या सेवा बंद ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे किरकोळ व्यावसायिकांवर गदा आली आहे. देशात करोनाग्रस्तांची १ हजारांच्या वर गेली आहे. लॉकडाउनच्या दरम्यान किराणा दुकानं, भाजीपाला, पशू खाद्याची दुकानं, मेडिकल स्टोअर्स हे सगळं वगळण्यात आलं आहे. हातावर पोट असलेल्या कामगारांची, बेघरांची गैरसोय होते आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यासाठी विशेष पॅकेजही जाहीर केलं आहे.