अमेरिकेत परतल्यानंतरही राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या मनात भारत दौऱ्याच्या आठवणी ताज्या आहेत. दक्षिण कॅरोलिनामध्ये एक जनसभेमध्ये बोलताना त्यांनी भारत दौऱ्याचा विशेष उल्लेख केला. ट्रम्प अजूनही भारतातील विशाल जनसमुदायाला विसरु शकलेले नाहीत.

माझा भारत दौरा ‘उपयुक्त’ होता असे ट्रम्प म्हणाले. अमेरिकेच्या दक्षिण पूर्वेकडील राज्यामध्ये येणाऱ्या दक्षिण कॅरोलिनात एका जनसभेला त्यांनी संबोधित केले. त्यावेळी समोर उपस्थित जनसमुदायाला पाहून त्यांना भारत दौऱ्याची आठवण आली. या सभेला तुलनेने कमी लोक आले होते “अहमदाबाच्या मोटेरा स्टेडिअमवर एक लाखाच्या जनसमुदायाला संबोधित केल्यानंतर मी, कदाचितच कुठल्या जनसभेला संबोधित करण्यासाठी इतका उत्सुक असेन” असे ट्रम्प यांनी म्हटले आहे.

नरेंद्र मोदींचेही ट्रम्प यांनी कौतुक केले. मोदी एक चांगला माणून आहे. देशवासियांचे त्यांच्यावर प्रेम आहे असे ट्रम्प म्हणाले. “मी भारताच्या पंतप्रधानांसोबत होता. मोदी एक चांगली व्यक्ती असून, देशातील जनताही त्यांच्यावर प्रेम करते. मला माझ्या सभेला जमणाऱ्या गर्दीबद्दल बोलायला आवडते, कारण माझ्या सभेइतकी गर्दी अन्य कोणाच्या सभेला होत नाही” असे ट्रम्प म्हणाले.

“भारतात जाऊन आल्यानंतर कदाचित मला आता गर्दीबद्दल तितका उत्साह वाटणार नाही. याबद्दल विचार करा, ते १५० कोटी लोक होते. आपण ३५०. याचाच अर्थ आपण काहीतरी चांगले करत आहोत. माझ्या या सभेला जमलेल्या गर्दीवर माझे प्रेम आहे आणि भारतातल्या सभेला आलेल्या लोकांवरही माझे तितकेच प्रेम आहे. त्यांच्याकडे एक महान नेता आहे. माझा भारत दौरा खूपच उपयुक्त होता” असे ट्रम्प म्हणाले.