भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी टीना डाबी आणि अतहर आमिर खान या दोघांनी नुकतेच लग्न केले. या दोघांचे लग्न हा देशपातळीवर चर्चेचा विषय ठरला आहे. कारण टीना या हिंदू दलित तर अतहर मुस्लिम समाजाचे आहेत. त्यामुळेच सध्याच्या असहिष्णुतेच्या आणि जातीय हिंसाचाराच्या वातावरणात या दोघांचे लग्न म्हणजे आदर्श असल्याची प्रतिक्रिया काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी दिली आहे. आपल्या ट्विटर हँडलवरुन त्यांनी टीना आणि अतहर यांना लग्नाच्या शुभेच्छाही दिल्या आहेत. हे दोघेही आयएएसच्या परिक्षेत टॉपर राहिले आहेत.


२२ व्या वर्षीच आयएएस टॉपर बनलेल्या टीना यांचे त्यावेळी माध्यमांमधून मोठे कौतुक आणि चर्चा झाली होती. त्यापेक्षाही जास्त चर्चा त्यांच्या आणि अतहर आमिर यांच्या नात्याची झाली होती. आयएएसच्या ट्रेनिंगदरम्यान, या दोघांची भेट दिल्लीच्या नॉर्थ ब्लॉकमधील डिपार्टमेंट ऑफ पर्सनल अॅण्ड ट्रेनिंगच्या कार्यालयात झाली होती. पहिल्या नजरेतच दोघांचे एकमेकांवर प्रेम जडले होते. मात्र, त्यांच्या या प्रेमाला अनेक हिंदू संघटनांनी विरोध दर्शवला होता. तसेच त्याला लव्ह जिहादही म्हटले होते.

या विरोधामुळे टीना आणि अतहर यांना विशेष फरक पडला नसला तरी त्यांचे प्रेम कमी झाले नाही. उलट शनिवारी (७ मार्च) हे दोघे लग्नबंधनात अडकले. त्यांच्या लग्नाच्या बातमीनंतरही हे दोघे माध्यमांमध्ये चर्चेत राहिले. दरम्यान, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी ट्विट करीत या दोघांना लग्नाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच सध्याच्या वाढत्या असहिष्णुतेच्या आणि जातीय हिंसाचाराच्या वातावरणात त्यांनी एक आदर्श निर्माण केल्याचे म्हटले.

काश्मीरमधील पर्यटकांसाठीचे सर्वांत लोकप्रिय ठिकाण असलेल्या पहलगाम शहराची टीना आणि अतहरने आपल्या लग्नासाठी निवड केली होती. टीना शुक्रवारीच आपले कुटुंबिय आणि नातेवाईंकासह पहलगाम येथे पोहोचल्या होत्या. त्यानंतर त्या अतहर आमिर खान यांच्यासोबत विवाहबंधनात अडकल्या.