16 December 2017

News Flash

वेडय़ा बहिणीची वेडी ही ‘माया’..

बहुजन समाज पार्टीच्या सर्वेसर्वा मायावती उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी तिसऱ्यांदा आरूढ झाल्यानंतर सन २००७ ते

एक्स्प्रेस वृत्तसेवा, नवी दिल्ली | Updated: February 1, 2013 4:06 AM

बहुजन समाज पार्टीच्या सर्वेसर्वा मायावती उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी तिसऱ्यांदा आरूढ झाल्यानंतर सन २००७ ते २०१२ या ‘पंचवार्षिक’ कालावधीत त्यांचे कनिष्ठ बंधू आनंद कुमार यांच्या रिअल इस्टेट उद्योगाची भरभराट ज्या नेत्रदीपक पद्घतीने झाली, ती कोणालाही थक्क करील अशीच असून या सर्व ‘प्रगती’चा तपशील अधिकृत दस्तावेजांच्या साहाय्याने उघड झाला आहे.
‘डीएलएफ’, ‘युनिटेक’, ‘जेपी’ यासारख्या राष्ट्रीय स्तरावरील बडय़ा ‘रिअल इस्टेट’ कंपन्यांचे थेट लागेबांधे आनंद कुमार आणि मायावती यांचे सल्लागार व विद्यमान राज्यसभा सदस्य सतीशचंद्र मिश्र, त्यांचे चिरंजीव कपिल यांच्याशी जुळले असल्याचे ‘दी इण्डियन एक्स्प्रेस’ ने केलेल्या तपासाअंती उघडकीस आले आहे. या सर्वाचे कार्यस्थळ प्रामुख्याने उत्तर प्रदेशात नॉइडा व ग्रेटर नॉइडा येथे असल्याचेही स्पष्ट झाले आहे. संबंधित फर्म, कंपन्यांशी ‘एक्स्प्रेस’च्या प्रतिनिधींनी यासंदर्भात संपर्क साधला असता, तत्कालीन राज्य सरकारशी आमचा काहीही संबंध नव्हता आणि आमचे सर्व व्यवहार कायद्यास धरून असल्याचे या कंपन्यांकडून स्पष्ट करण्यात आले. दस्तुरखुद्द मायावती यांनाही गेल्या आठवडय़ात ‘एक्स्प्रेस’ कडून एक प्रश्नावली पाठविण्यात आली असता, ‘रिअल इस्टेट’ क्षेत्रातील कोणत्याही कंपन्यांशी आपल्या भावाचे कसलेही संबंध नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते. आपल्या भावाच्या व्यवसाय उद्योगात काहीही गैर नाही आणि यासंदर्भात आलेले वृत्त असत्य आणि तथ्यहीन असल्याचा दावाही मायावती यांनी केला होता. आपले विरोधक शिळ्या कढीलाच ऊत आणत असल्याचाही आरोप मायावती यांनी त्या वेळी केला होता.
मात्र, मायावती यांच्या याच दाव्यास छेद देणारा तपशील ‘एक्स्प्रेस’ ने उघड केला असून त्यानुसार, आनंद कुमार यांनी सुमारे ५० कंपन्या स्थापन केल्याचे स्पष्ट झाले आहे. मार्च-२०१२ अखेरीस या कंपन्यांची मालमत्ता ७५० कोटी रुपयांहून अधिक होती आणि या ५० कंपन्यांपैकी केवळ ‘हॉटेल लायब्ररी क्लब लिमिटेड’ ही कंपनी २००७ पूर्वी स्थापन झाली होती. या कंपनीचे मुख्यालय मसुरी येथे असून तिच्या अखत्यारीखाली तेथे ‘हॉटेल शेल्टन’ चालविण्यात येते. या हॉटेलचे भांडवली मूल्य २४ लाख रुपये असून मार्च २०१२ अखेर या कंपनीकडे २८७ कोटी रुपयांची मालमत्ता-तीही प्रामुख्याने रोखीने-होती. उल्लेखनीय बाब म्हणजे, मार्च-२००८ च्या अखेरीस या कंपनीकडे ‘अवघे’ ४३ कोटी रुपयांचे भांडवल होते. म्हणजेच केवळ चार वर्षांच्या कालावधीत ४३ ते २८७ कोटी रुपयांची ही चढती, २४४ कोटींची वाढ कोणालाही आश्चर्यचकीत तसेच ‘प्रोत्साहित’ ही करणारीच आहे.
२००७-०८ या वर्षांतच आनंद कुमार यांच्या सहयोगी कंपन्यांचे ‘कार्नोस्टी मॅनेजमेण्ट प्रा. लिमिटेड’ या दिल्लीतील कंपनीशी लागेबांधे जुळले होते. या कंपनीची नोंदणी नवी दिल्लीतील जनकपुरी येथे २००६ मध्ये नोंदणी झाली. ‘कार्नोस्टी मॅनेटमेण्ट प्रा. लिमिटेड’ ही कंपनी प्रामुख्याने ‘रिअल इस्टेट’, ‘हॉस्पिटॅलिटी’, ‘हॉटेल व्यवसाय’, आदी उद्योगांमध्ये गुंतली आहे. मार्च २०१२ अखेरीस या कंपनीची उलाढाल होती ‘केवळ ६२० कोटी’ रुपयांच्या घरात! रिअल इस्टेटमधील ‘डीएलएफ’ व ‘युनिटेक’ या कंपन्यांनी सन २०१० ते २०१२ दरम्यान ‘कार्नोस्टी मॅनेजमेण्ट प्रा. लिमिटेड’ मध्ये सहा कोटी व ३३५ कोटी रुपये गुंतविले. अर्थात ही गुंतवणूक ‘नेहमीप्रमाणे’च, नित्याची असल्याचे ‘डीएलएफ’ व ‘युनिटेक’ सांगण्यास विसरली नाही. या दोन्ही कंपन्या तसेच ‘जेपी’ यांची ‘कार्नोस्टी मॅनेजमेण्ट प्रा. लिमिटेड’ समवेत संयुक्त भागीदारी असून उत्तर प्रदेशात त्यांचे गृहबांधणी व व्यावसायिक प्रकल्प आहेत.
‘हॉटेल लायब्ररी क्लब’ च्या अखत्यारीत आणखीही तीन सहयोगी कंपन्या असून मार्च २०१२ अखेरीस त्यांच्या बँक खात्यातील शिल्लक रक्कम ३२० कोटी रुपये होती. या सहयोगी कंपन्यांपैकी ‘रिव्होल्युशनरी रिटेलर्स’ या कंपनीने २०११-१२ या वर्षांत ६० कोटी रुपये कमावले आणि मार्च-२०१२ अखेरीस त्यांच्या बँक खात्यातील शिल्लक रक्कम होती केवळ ५४ कोटी रुपये! ‘रिव्होल्युशनरी रिटेलर्स’ चीच सहयोगी कंपनी असलेल्या ‘तमन्ना डेव्हलपर्स’ या कंपनीकडे मार्च-२०१२ अखेरीस फक्त १६० कोटी रुपयांचा ‘अतिरिक्त निधी’ होता. ‘हॉटेल लायब्ररी’ व ‘रिव्होल्युशनरी रिटेलर्स’ कडून आनंद कुमार दरवर्षी केवळ १.२ कोटी रुपये ‘वेतना’पोटी घेतात.
‘एसडीएस’ समूहाचे दीपक बन्साल हे आनंद कुमार यांचे उद्योग व्यवसायातील मुख्य सहकारी असून ‘हॉटेल लायब्ररी’ चे संचालकही आहेत. बन्साल हे नॉइडा व ग्रेटर नॉइडा येथे २,५०० अपार्टमेण्ट उभारीत आहेत. बन्साल यांची ‘एसडीएस डेव्हलपर्स’ ही कंपनी ‘कार्नोस्टी मॅनेजमेण्ट प्रा. लिमिटेड’ ची उपकंपनी आहे. सतीशचंद्र मिश्र यांचे चिरंजीव कपिल यांचेही आनंद कुमार यांच्याशी व्यावसायिक संबंध असल्याचे स्पष्ट झाले आहे. आनंद कुमार यांच्या ‘दिया रिटेलर्स प्रा. लि.’ या कंपनीत कपिल हे भागीदार असून मार्च २०१२ अखेरीस या कंपनीची मालमत्ता ७८.८६८ कोटी रुपयांच्या घरात होती. त्यातही ७८.८१६ कोटी रुपये रोखीत होते.मायावती यांच्या बंधूंच्या ‘उद्योगां’ची अशी गाथा असून यापैकी बराच भाग बाहेर आलेला नाही. दरम्यान, तत्कालीन बसप सरकारने आपल्याला कोणतीही जमीन किंवा भूखंड दिलेला नव्हता आणि आमची सर्व गुंतवणूक पारदर्शी व कायद्यास धरून असल्याचा दावा ‘युनिटेक’ कंपनीने केला तर आम्ही केवळ सहा कोटी रुपयांचीच केलेली गुंतवणूक २०११-१२ च्या वार्षिक हिशेबात दाखविली असल्याचे ‘डीएलएफ’ ने स्पष्ट केले. याखेरीज आनंद कुमार, सतीशचंद्र मिश्र, कपिल मिश्र यांच्याशी आमचे कोणतेही व्यावसायिक संबंध नाहीत, असे ‘कार्नोस्टी मॅनेजमेण्ट प्रा. लिमिटेड’ ने म्हटले आहे.

ये कैसी माया है ? मायावती बंधू  आनंद कुमार यांनी सुमारे ५० कंपन्या स्थापन केल्याचे स्पष्ट झाले आहे. मार्च-२०१२ अखेरीस या कंपन्यांची मालमत्ता ७५० कोटी रुपयांहून अधिक होती आणि या ५० कंपन्यांपैकी केवळ ‘हॉटेल लायब्ररी क्लब लिमिटेड’ ही कंपनी २००७ पूर्वी स्थापन झाली होती.या कंपनीचे मुख्यालय मसुरी येथे असून तिच्या अखत्यारीखाली तेथे ‘हॉटेल शेल्टन’ चालविण्यात येते. या हॉटेलचे भांडवली मूल्य २४ लाख रुपये असून मार्च २०१२ अखेर या कंपनीकडे २८७ कोटी रुपयांची मालमत्ता-तीही प्रामुख्याने रोखीने-होती.

First Published on February 1, 2013 4:06 am

Web Title: mayawati collect huge money during his cm period
टॅग Mayawati