केंद्रात दुसऱ्यांदा सत्तेत आलेल्या मोदी सरकारला एक वर्ष पूर्ण झालं आहे. यापार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना पत्र लिहून संवाद साधला होता. सरकारच्या वर्षपूर्तीवरून बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्षा आणि उत्तर प्रदेशाच्या माजी मुख्यमंत्री मायावती यांनी टीका केली आहे. त्याचबरोबर सरकारनं देश व सामान्य माणसाच्या हिताविषयी गंभीरपणे चिंतन करावं, असा सल्लाही दिला आहे.

मोदी सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त मायावती यांनी ट्विट केलं आहे. “केंद्रामध्ये सत्तेत असलेल्या भाजपा सरकारकडून वर्षपूर्ती झाल्याबद्दल अनेक दावे केले जात आहेत. पण सत्य परिस्थिती आणि नागरिकांच्या आकलनापासून नसतील तर चांगलं आहे. खरंतर भाजपा सरकारचा कार्यकाळ वादांनी घेरलेला राहिला. त्यामुळे त्यांनी देश व सामान्य माणसाच्या हिताविषयी गंभीरपणे विचार करणं आवश्यक आहे. देशातील जवळपास १३० कोटी संख्येमध्ये गरीब, बेरोजगार, शेतकरी, स्थलांतरित मजूर व महिला यांचं जीवन आज पूर्वीपेक्षा अधिक त्रासदायक झालं आहे. जे की अतिशय दुःखद आहे. हे लवकर विसरता येणार नाही,” असं मायावतींनी यांनी म्हटलं आहे.

आणखी वाचा- … पण हे पत्रही एकदा नक्की वाचाच; प्रियंका गांधींची मोदींना विनंती

“अशा परिस्थितीत केंद्र सरकारनं आपली धोरण आणि काम करण्याच्या पद्धतीची समीक्षा करायला हवी. ज्या ठिकाणी उणीवा दिसून येतात, त्यावर पडदा टाकण्याऐवजी त्या दूर करायला हव्यात. देशाहितासाठी बीएसपी भाजपाला हाच सल्ला आहे,” असं मायावती यांनी म्हटलं आहे.