आर्थिक मागास मुस्लिमांसाठी स्वतंत्र आरक्षणाचा कोटा देण्यात यावा अशी मागणी बहुजन समाज पार्टीच्या प्रमुख मायावती यांनी केली आहे. मंगळवारी आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात त्यांनी केंद्र सरकारकडे ही मागणी केली. आगामी लोकसभा निवडणुकांसाठी सपा-बसपाची युती झाली आहे. या युतीच्या विजयात मुस्लिम समाज महत्वाची भुमिका बजावू शकते.

मायावती म्हणाल्या, १९४७ मध्ये सरकारी नोकऱ्यांमध्ये मुस्लिमांची संख्या ३३ टक्के होती. मात्र आता या संख्येत कमालीची घट होऊन ती २-३ टक्के इतकी झाली आहे. त्या पुढे म्हणाल्या, आम्ही जरी सवर्णांसाठीच्या १० टक्के आरक्षणाचे स्वागत केले असले तरी याचा फायदा मुस्लिम आणि इतर अल्पसंख्यांकांना मिळणार नाही.

मायावतींनी बसपा आणि समाजवादी पार्टीच्या कार्यकर्त्यांना निवडणुकीत आपले वेगळेपण राखण्याचे आवाहन केले. तसेच आगामी निवडणुकीत सपा-बसपा युतीचा झालेला विजय हाच माझ्यासाठी सर्वात चांगले बर्थडे गिफ्ट असेल असे त्यांनी म्हटले. उत्तर प्रदेशच ठरवेल की दिल्लीत पंतप्रधानपदी कोण बसेल असेही त्या यावेळी म्हणाल्या. अखिलेश यादवांनीही सपा-बसपा युती जाहीर करतेवेळी हेच म्हटले होते.

भाजपा आणि आरएसएसवर टीका करताना त्या म्हणाल्या की, त्यांचे नेते धर्मावरुन राजकारण करीत आहेत. त्यांनी मुस्लिमांना नमाज पठणापासून रोखण्यासाठी सरकारी यंत्रणेचा गैरवापर केला होता. भाजपाकडून तर देवांनाही जातीमध्ये विभागण्याचे काम सुरु आहे. भाजपाच्या नेत्यांना तर देवांच्या जाती सांगायची घाईच झाली असल्याची खरमरीत टीकाही त्यांनी यावेळी केली.