बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. पंतप्रधान मोदींचे भावूक होणे, अश्रू ढाळणे म्हणजे ब्लॅकमेलिंग असल्याची टीका मायावती यांनी केली आहे. ‘पंतप्रधान मोदी वारंवार भावूक होतात. ते अनेकदा अश्रू ढाळतात. हे सर्व लोकांना ब्लॅकमेलिंग करणे नाही, तर काय आहे ?,’ असा सवाल मायावतींनी उपस्थित केला आहे.

‘पंतप्रधानांनी त्यांच्या घराचा, कुटुंबाचा देशासाठी त्याग केला, ही गोष्ट चांगली आहे. मात्र याचा अर्थ त्यांना लोकांना त्रास द्यावा, असा होत नाही,’ असे मायावती पुढे म्हणाल्या. मायावती यांनी नोटाबंदीच्या निर्णयाच्या गोपनीयतेबद्दलही शंका उपस्थित केली. ‘भाजप नेत्यांच्या चेहऱ्यावर कोणतीही चिंता दिसत नाही. त्यांना काळा पैश्याच्या बंदोबस्तासाठी पुरेसा वेळ देण्यात आला,’ असे मायावती यांनी म्हटले आहे. ‘देशातील एटीएम आणि बँकांबाहेर लोकांच्या रांगा आहेत. या परिस्थितीत देशाचे वातावरण बिघडू शकते. जर देशात दंगली झाल्या, तर त्यासाठी पंतप्रधान मोदीच जबाबदार असतील,’ असे मायावतींनी म्हटले.

बहुजन समाज पक्ष राजकीय फायद्यासाठी नव्हे, तर देशहितासाठी नोटाबंदीचा विरोध करते आहे, असे म्हणत मायावतींनी त्यांच्या पक्षाची भूमिका स्पष्ट केली. ‘केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे कोणताही फायदा होणार नाही. यामुळे केवळ आर्थिक आणीबाणी निर्माण झाली आहे. सामान्य माणसाला त्रास सहन करावा लागतो आहे. मोदी सरकारकडून केवळ राजकीय लाभासाठी नोटाबंदीचा निर्णय घेण्यात आला. मात्र आता हा निर्णय सरकारच्या अंगाशी येतो आहे. त्यामुळेच पंतप्रधान मोदींना संसदेत विरोधी पक्षांना सामोरे जाण्यास भीती वाटते आहे,’ असे म्हणत मायावतींनी मोदींवर शरसंधान साधले आहे. याआधी संसदेत बोलतानाही मायावतींनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली होती.

‘उत्तर प्रदेशात भाजपला केवळ बहुजन समाज पक्ष टक्कर देऊ शकतो. समाजवादी पक्ष आणि काँग्रेसची अवस्था फारशी चांगली नाही. त्यामुळे त्यांच्यापासून बसपला कोणताही धोका नाही,’ असेही यावेळी मायवतींनी म्हटले. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांचा बबुआ म्हणून उल्लेख करत मायावतींनी टीका केली. ‘जोपर्यंत राज्यात मुलायम आणि त्यांचा मुलगा बबुआ यांची सत्ता असेल, तोपर्यंत जनता सुखी होऊ शकणार नाही,’ असे म्हणत मायावतींनी अखिलेश यांच्यावर टीका केली. काही दिवसांपूर्वीत अखिलेश यांनी अखिलेश यादव यांनी मायावतींचा उल्लेख बुआ म्हणून केला होता. त्याचा संदर्भ घेत मायावतींनी अखिलेश यांच्यावर पलटवार केला.