ब्राह्मण समाजातील आर्थिकदृष्टय़ा दुूर्बल असलेल्या व्यक्तिंना दलितांप्रमाणेच सरकारी नोकऱ्यांत तसेच अन्यत्र आरक्षणाचा लाभ व्हावा, यासाठी आपण कटिबद्ध राहू, अशी घोषणा बहुजन समाज पक्षाच्या नेत्या मायावती यांनी गुरुवारी लखनऊत ब्राह्मण संमेलनात केली. बहुजन समाज पक्षाने ब्राह्मण भाईचारा समिती स्थापन केली असून ब्राह्मण समाजाला बसपच्या जवळ आणण्यासाठी ही समिती काम करणार आहे.
सुशीलचंद्र मिश्रा यांच्या बसप प्रवेशाने २००७ साली दलित व ब्राह्मण तसेच मुस्लीम अशी युती झाली. ‘यह हाथी नहीं गणेश है, ब्रह्मा, विष्णु, महेश है’ ही घोषणा तेव्हा मायावती यांनी दिली. त्या सामाजिक प्रयोगाने बसप सत्तेत आली होती. तोच प्रयोग पुन्हा राबविण्याचा मायावती यांचा प्रयत्न या संमेलनाच्या निमित्ताने उघड झाला आहे.
मायावतींनी गुरुवारी लोकसभेच्या आगामी निवडणुकीसाठी ३६ उमेदवारांच्या नावांची यादी जाहीर केली असून त्यामध्ये १८ सवर्ण आहेत.
उत्तर प्रदेशात सपच्या राजवटीत सवर्णावर अत्याचार होत असल्याचा आरोप मायावती यांनी केला. दलितांवर ज्याप्रमाणे अत्याचार होतात त्याप्रमाणे सप ब्राह्मणांवर अत्याचार करीत असल्याचे त्यांनी वार्ताहरांना सांगितले.
इटावा येथे एका ब्राह्मण कुटुंबाचा छळ करण्यात आला, त्याचे उदाहरण मायावती यांनी दिले. तेथे ‘सर्व समाज’शी निगडित लोकांवर अत्याचार केले जात आहेत. इटावा येथे ब्राह्मणांवर अधिक अत्याचार होत आहेत, असे त्या म्हणाल्या.
विरोधी पक्षांच्या चुकीच्या प्रचाराला सवर्ण बळी पडू नयेत यासाठी बसपाने प्रचाराचा मुद्दा तयार केला आहे. बसपा सरकारने केलेल्या कामगिरीबाबतची माहितीही देण्यात येणार आहे. आपला पक्ष कोणत्याही विशिष्ट जाती अथवा समाजासाठी नाही तर सत्तेत असताना आम्ही सर्वासाठी काम केले आणि सर्वाना समान प्रतिनिधित्व दिले, असेही त्या म्हणाल्या.