जम्मू काश्मीरातील परिस्थिती संवेदनशील असताना राहुल गांधी यांनी विरोधी पक्षातील नेत्यांसह केलेल्या काश्मीर दौऱ्यावरून बहुजन समाज पक्षाच्या नेत्या आणि उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती चांगल्याच भडकल्या आहेत. कलम ३७० रद्द केल्यानंतर परिस्थिती पूर्वपदावर येण्यासाठी वेळ लागेल. पण, राहुल गांधी आणि विरोधीपक्षाच्या नेत्यांनी केलेला दौरा म्हणजे भाजपाला राजकारण करण्याची संधी दिल्यासारखेच आहे, अशी टीका मायावती यांनी केली आहे.

जम्मू काश्मीरातील परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर येऊ लागली आहे. मात्र तणाव टाळण्यासाठी राजकीय नेत्यांना प्रवेश बंदी करण्यात आलेली आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी विरोधी पक्षातील नेत्यांसह काश्मीरच्या दौऱ्यावर गेले होते. पण, त्यांना श्रीनगरमधून परत पाठवण्यात आले. हा दौरा म्हणजे भाजपाला राजकारणासाठी आयत कोलीत दिल्यासारखाच आहे, असे म्हणत मायावती यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

मायावती म्हणाल्या, डॉ. भिमराव आंबेडकर नेहमीच देशाच्या समता, एकात्मता आणि अखंडतेच्या बाजूने राहिले आहेत. त्यामुळेच बाबासाहेबांनी कलम ३७० ची तरतूद करण्याच्या विरोधात होते. याच कारणामुळे बसपाने हे कलम हटवण्याचे समर्थन केले आहे. देशात संविधानाची अंमलबजावणी झाल्याच्या ६९ वर्षांनंतर कलम ३७० हटवण्यात आले. त्यामुळे काश्मीर खोऱ्यातील परिस्थिती पूर्वपदावर येण्यास वेळ लागेल. त्यासाठी प्रतीक्षा करायला हवी. न्यायालयाने सुद्धा हे मान्य केले आहे. पण अशा वातावरणात विनापरवानगी काँग्रेससह इतर पक्षाच्या नेत्यांनी काश्मीरचा दौरा करणे हे केंद्र सरकार आणि राज्यपाल यांना राजकारण करण्यासाठी संधी दिल्यासारखे नाही का? तिथे जाण्यापूर्वी याचा विचार केला असता तर बरे झाले असते, असा सल्ला मायावतींनी दिला.