प्लास्टिकचा वापर आणि ग्लोबल वॉर्मिंगची सगळीकडे जोरदार चर्चा सुरु असताना मॅकडोनल्ड या कंपनीने एक कौतुकास्पद पाऊल उचलले आहे. जगभरात प्रसिद्ध असलेल्या या फूड चेनने आपल्याकडे वापरले जाणार प्लास्टीकचे स्ट्रॉ बंद करुन त्याऐवजी कागदी स्ट्रॉ वापरण्याचा निर्णय घेतला आहे. सुरुवातीच्या टप्प्यात हा प्रयोग लंडनमध्ये कऱण्यात येणार असून टप्प्याटप्प्याने जगभरात त्याचा प्रसार करण्यात येईल असे कंपनीकडून सांगण्यात आले आहे. सध्या लंडनमध्ये मॅकडीची १३०० दुकाने आहेत. या सर्व ठिकाणी मे महिन्यापासून कागदी स्ट्रॉचा प्रायोगिक तत्त्वावर वापर करण्यात येणार आहे.

यातही सरसकट सगळ्या ग्राहकांना हे कागदी स्ट्रॉ देण्यात येणार नसून जे ग्राहक स्ट्रॉची मागणी करतील त्यांनाच हे स्ट्रॉ देण्यात येतील असे कंपनीकडून सांगण्यात आले आहे. मॅकडोनल्डचे सध्या जगभरात मोठ्या प्रमाणात ग्राहक असून लंडनमध्ये ही संख्या सर्वाधिक आहे. याठिकाणी प्लास्टिक स्ट्रॉ बंद करण्यात आल्यानंतर प्लास्टिकमुळे होणारे प्रदूषण मोठ्या प्रमाणात कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जर तुम्हाला स्ट्रॉची आवश्यकता असेल तर तो तुम्हाला मागून घ्यावा लागेल. तो आधीप्रमाणे दुकानातील कर्मचारी स्वत: देणार नाही असे मॅकडोनल्डचे मुख्य कार्यकारी अधिकारी पॉल पॉमरॉय यांनी सांगितले.

यापुढे पॉल म्हणाले, या स्ट्रॉच्या कागदाचा पुर्नवापर करता येणार असल्याने त्यादृष्टीनेही प्रयत्न सुरु आहेत. एकट्या लंडनमध्ये वर्षाला ८५ लाख स्ट्रॉ वापरले जातात. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पर्यावरणाचे नुकसान होत असल्याने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. मॅकडोनल्डबरोबरच पिझ्झा एक्सप्रेस आणि जेडी वेदरस्पून या मोठ्या फूड चेनकडूनही येत्या काळात प्लास्टिकच्या स्ट्रॉवर बंदी घालण्याची शक्यता आहे. मॅकडोनल्डच्या या निर्णयाचे स्वागत युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनीही केले आहे. त्याने यासंदर्भातील एक ट्विट करत मॅकडोनल्डचा हा निर्णय अतिशय स्वागतार्ह आहे असे म्हटले आहे. लवकरच हा निर्णय भारतात यावा अशी इच्छाही त्यांनी व्यक्त केली आहे.