परराष्ट्र खाते हे कोणताही गाजावाजा किंवा गोंगाट न करता काम करते. मात्र, सरतेशेवटी हे काम पूर्ण होते, असे वक्तव्य परराष्ट्र खात्याचे राज्यमंत्री जनरल व्ही.के. सिंह यांनी केले. येमेनमध्ये आयसिस या दहशतवादी संघटनेने अपहरण केलेल्या ख्रिश्चन धर्मगुरु टॉम उझहन्निल यांच्या सुटकेच्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते. टॉम उझहन्निल यांचे अपहरण झाल्यानंतर परराष्ट्र खात्यावर करण्यात आलेली टीका आजही माझ्या लक्षात आहे. त्यांची सुखरूप सुटका झाल्याच्या मला आनंद आहे. विशेष म्हणजे त्यांच्या सुटकेसाठी सरकारकडून अपहरणकर्त्यांना कोणतीही खंडणी देण्यात आली नाही. यावरून स्पष्ट होते की, परराष्ट्र खाते गोंगाट न करता काम करत असले तरी आम्हाला आमचा हेतू योग्यप्रकारे साध्य करता येतो. सुटका करण्यात आल्यानंतर मंगळवारी रात्री टॉम उझहन्निल व्हॅटिकन येथे पोहोचले. कालच परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी ट्विटरवरून टॉम यांच्या सुटकेबद्दलची माहिती दिली होती.

ख्रिश्चन मिशनरीतर्फे चालवण्यात येणाऱ्या वृद्धाश्रमात धर्मगुरु टॉम उझहन्निल कार्यरत होते. टॉम उझहन्निल हे केरळचे रहिवासी आहेत. मार्च २०१६ मध्ये येमेनमधील अदेन शहराच्या दक्षिण भागात आयसिसच्या दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. यानंतर दहशतवाद्यांनी टॉम उझहन्निल यांचे अपहरण केले होते. त्यांच्या सुटकेसाठी भारताचे प्रयत्न सुरु होते. यात येमेनसह सौदी अरेबिया आणि ओमान या देशांची मदत घेतली जात होती. अखेर भारताच्या प्रयत्नांना यश आले असून दीड वर्षाने त्यांची सुटका करण्यात आली. ‘फादर टॉम यांची सुटका झाल्याची माहिती देताना मला आनंद होत आहे’ अशी माहिती सुषमा स्वराज यांनी ट्विटरवरुन दिली. यानंतर केरळमधील ख्रिस्ती बांधवांनी जल्लोष केला.