मध्य प्रदेशात पाच जणांना अटक

गोमांस घेऊन जात असल्याचा आरोप करून मध्य प्रदेशच्या शिवनी जिल्ह्य़ात संशयित गोरक्षांनी दोन जणांना लाठय़ाकाठय़ांनी बेदम मारहाण करण्याचा प्रकार घडल्यानंतर पोलिसांनी पाच जणांना अटक केली.

गोरक्षकांच्या एका गटाने सदर दोन तरुणांसोबत असलेल्या एका महिलेलाही चपलेने मारहाण करण्यास या दोघांना भाग पाडले, असे पोलिसांनी सांगितले. मध्य प्रदेशमध्ये गोमांस बाळगणे आणि त्याची विक्री करणे बेकायदा असल्याने मारहाण झालेल्या तिघांनाही अटक करण्यात आली आहे.

कथित गोरक्षकांच्या गटाने दोन व्यक्तींना मारहाण केल्याचा व्हिडीओ समाज माध्यमांवर व्हायरल झाला आहे. गोरक्षकांनी या तिघांना ‘जय श्रीराम’ अशा घोषणा देण्यासही भाग पाडल्याचे दिसत आहे. हा  प्रकार २२ मे रोजी कान्हीवाडा परिसरातील मांडला रस्त्यावर घडल्याचे पोलिसांनी सांगितले. सदर पाच जणांविरुद्ध एफआयआर नोंदविण्यात आल्याचे आणि त्यांना अटक करण्यात आल्याचे शिवनीचे पोलीस अधीक्षक ललित शाक्यवार यांनी सांगितले. या हल्ल्यात तिघांपैकी एकालाही गंभीर दुखापत झालेली नाही. एका आरोपीने २३ मे रोजी व्हिडीओ व्हायरल केला, मात्र त्यावर टीका झाल्यानंतर त्याने तो मागे घेतला होता.