पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची माहिती
विमानाच्या धर्तीवर रेल्वेगाडय़ांच्या चालकांना मानवरहित रेल्वे फाटकांवर खबरदारीचा इशारा देणारी यंत्रणा लवकरच सुरू केली जाईल. वाराणसी येथील डिझेल इंजिन कारखान्यातील अभियंत्यांनी आपल्या सल्ल्यानुसार हे तंत्रज्ञान विकसित केले आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी सांगितले.
मानवरहित फाटकांसाठी अनेक उपाय आहेत. उपग्रहांची त्यासाठी मदत घेतली जाऊ शकते काय याबाबतही विचार व्हायला हवा, असे मोदी यांनी वैज्ञानिकांच्या एका कार्यक्रमात बोलताना सांगितले. मानवरहित फाटकांमुळे दरवर्षी अनेक अपघात होऊन फार मोठय़ा प्रमाणात जीव जात असतात.
वाराणसीतील डिझेल इंजिन कारखान्याला दिलेल्या भेटीचा संदर्भ देऊन मोदी म्हणाले की, रेल्वेगाडय़ांच्या चालकांना रेल्वे फाटकांवर खबरदार करणारे तंत्रज्ञान विकसित करण्याची सूचना मी त्यांना केली होती. हे तंत्रज्ञान लवकरच अमलात येईल. ज्याप्रमाणे वैमानिकाला ढग व इतर मुद्दय़ांबद्दल आधीच सूचना मिळते, त्याच्या धर्तीवरच ही यंत्रणा राहील.
अंतराळ तंत्रज्ञानाचा उपयोग सामान्य माणसाच्या फायद्यासाठी करण्यात कुठलीही कसर शिल्लक राहू नये, यावर भर देतानाच प्रशासनाच्या मदतीसाठी नावीन्यपूर्ण तंत्रज्ञान शोधण्याचे आवाहन त्यांनी वैज्ञानिकांना केले.

आज उद्योगपतींना भेटणार
जागतिक आर्थिक परिस्थतीबाबत पंतप्रधान मंगळवारी रिलायन्स इंडस्ट्रीजचे प्रमुख मुकेश अंबानी व टाटा समूहाचे अध्यक्ष सायरस मिस्त्री यांच्यासह आघाडीच्या उद्योगपतींशी सविस्तर चर्चा करणार आहेत. केंद्रीय मंत्री, सरकारचे व रिझव्‍‌र्ह बँकेचे उच्चपदस्थ अधिकारी, उद्योगांचे प्रतिनिधी, आघाडीचे बँकर्स, प्रमुख अर्थतज्ज्ञ यांच्यासह सुमारे ४० प्रतिनिधी यात भाग घेण्याची अपेक्षा आहे.