पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त गुजरातमधील नर्मदा नदीवरील सरदार सरोवर धरणातील पाण्याची पातळी वाढवण्यात आल्यावरुन नर्मदा बचाओ आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या समाजसेविका मेधा पाटकर यांनी टीका केली आहे. ‘एकीकडे हजारो लोक बुडत असताना दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी संपूर्ण धरणामधील पाण्याची पातळी वाढवण्यात आली. गुजरात सरकारच्या या निर्णयामुळे मध्य प्रदेशमधील धार, बरवानी आणि अलीराजपूरमधील १९२ गावांना फटका बसला आहे,’ असे पाटकर यांनी म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपला वाढदिवसानिमित्त (१७ सप्टेंबर) गुजरात दौऱ्यावर होते. त्यावेळी सरदार सरोवर धरणातील पाण्याची पातळी १३८.८६ मीटर इतकी करण्यात आली होती.

मेधा पाटकर यांनी केवळ मोदींच्या वाढदिवसासाठी धरणातील पाणी वाढवण्यावरुन सरकारवर टीका केली आहे. ‘पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपला वाढदिवस एखाद्या सणाप्रमाणे साजरा केला. मात्र सरदार सरोवर प्रकल्पामुळे प्रभावित झालेल्या लोकांचे अद्याप पूर्नवसन करण्यात आलेले नाही. धरणामधील पाण्याची पातळी नियोजित वेळेआधीच वाढवण्यात आली. केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदींचा वाढदिवस १७ सप्टेंबरला असतो म्हणून हा निर्णय गेण्यात आला. एकीकडे असे असताना दुसरीकडे सर्वोच्च न्यायलयाच्या आदेशानंतरही या प्रकल्पामुळे प्रभावित झालेल्या अनेक गावातील गावकऱ्यांना सरकारने अद्याप मोबदला दिलेला नाही. गुजरात सरकारने नुकसानभरपाई म्हणून प्रकल्पग्रस्तांना देण्यात येणारी १ हजार ८५७ कोटींची रक्कम आपल्याला दिलेली नसल्याचे मध्य प्रदेश सरकारचे म्हणणे आहे,’ असं पाटकर यांच म्हणणं आहे.

मध्य प्रदेशमध्ये काही महिन्यांपूर्वीपर्यंत सत्तेत असणाऱ्या शिवराज सिंह चौहान यांच्या नेतृत्वाखालील राज्यातील भाजपा सरकार प्रकल्पग्रस्तांच्या सध्याच्या परिस्थितीसाठी जबाबदार असल्याचे पाटकर सांगतात. ‘शिवराज सिंह चौहान यांनी आपण पूर्नवसनाचे काम पूर्णपणे केले आहे असा दावा केला होता. यासाठी शिवराज यांनी शून्य कर्ज प्रतिज्ञापत्रही सादर केले होते. मात्र ते प्रतिज्ञापत्र चुकीचे आहे. असं करुन शिवराज यांनी प्रकल्पग्रस्त लोकांचे अधिकार हिरावून घेतले आहेत,’ अशी टीका पाटकर यांनी केली आहे.

पाटकर यांनी गुजरात सरकाच्या धोरणांवरही टिका केली आहे. ‘गुजरातमधील विजय रुपाणी सरकारने धरणातील पाण्याचा स्तर १५ ऑक्टोबरपर्यंत वाढवण्यात येईल असं सांगितलं होतं. त्यानंतर त्यांनी ती तारीख ३0 सप्टेंबर केली. मात्र त्यांनी पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसाच्या दिवशी म्हणजेच १७ सप्टेंबरलाच धरणातील पाण्याची पातळी वाढवली. यावरुन गुजरात सरकारसाठी संविधान आणि कायदा महत्वाचा नाही हे स्पष्ट झालं आहे. हजारो लोकं बुडत असताना केवळ एका व्यक्तीसाठी धरण भरण्यात आले. म्हणून आम्ही पंतप्रधान मोदींचा वाढदिवस ‘धिक्कार दिवस’ म्हणून साजरा केला,’ असं पाटकर यांनी सांगितलं.

मध्य प्रदेशमधील बडवाणी येथे सरदार सरोवर धरणातील पाण्याचा स्तर वाढवल्याने प्रभावित झालेल्या परिसरातील नागरिकांनी आंदोलन करत रॅली काढून १७ सप्टेंबर हा दिवस ‘धिक्कार दिवस’ साजरा केला. या लोकांनी वाहतूकीचा रस्ताही अडवून धरला होता. तसेच काही आंदोलकांनी टक्कल करुन धिक्कार दिवस साजरा केला.