प्रसारमाध्यमांतील काही जणांनी आपल्या म्हणण्याचा विपर्यास केला असून आपण पंतप्रधानांना मारीन, असे म्हटलेच नसल्याचे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मंगळवारी स्पष्ट केले.प्रसारमाध्यमांतील काही जणांना आपल्या म्हणण्याचा विपर्यास करण्याची सवयच लागली आहे. आपले हितसंबंध जपण्यासाठी ते मी उच्चारलेल्या शब्दांचा गैरअर्थ लावतात, असा आरोप ममता यांनी केला. पंतप्रधानांना आपण मारहाण करू, असे कधीही म्हटले नव्हते, असेही त्या म्हणाल्या. खतांच्या किमतीत वाढ करण्याचा मुद्दा घेऊन आपण पंतप्रधानांना किमान १० वेळा भेटलो होतो. यापेक्षा आपण अधिक काही करू शकत नाही. आता मी त्यांना जाऊन मारू काय, असे म्हटले होते, याकडे ममता यांनी लक्ष वेधले. मी जे काही म्हणाले ते असे आहे. परंतु मी पंतप्रधानांना मारीन, असे वक्तव्य माझ्या तोंडी घालून माध्यमांनी माझ्या बोलण्याचा विपर्यास केला आणि यास काहीही आधार नाही, असे ममता बॅनर्जी यांनी स्पष्ट केले. पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्याबद्दल लोकशाहीविरोधी वक्तव्य केल्याबद्दल ममता बॅनर्जी यांनी माफी मागावी, अशी मागणी केंद्रीय नगरविकास राज्यमंत्री दीपा दासमुन्शी यांनी केली होती.
आपले म्हणणे स्पष्ट करताना ममता पुढे म्हणाल्या लोकशाहीत आपण पंतप्रधानांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करू शकतो, परंतु त्यांना मारू शकत नाही. यात मी काय चुकीचे बोलले, अशी विचारणा त्यांनी केली.