मध्य प्रदेशातील धार येथे पोलीस कॉन्स्टेबल भर्तीदरम्यान उमेदवारांच्या छातीवर SC – ST लिहिण्यावरुन निर्माण झालेला वाद अद्याप शमलेला नसताना राज्यात अजून एक धक्कादायक प्रकार घडला आहे. भींड येथे पोलीस भर्तीसाठी आलेल्या तरुण आणि तरुणींची एकाच रुममध्ये मेडिकल टेस्ट करण्यात आल्याने नवा वाद निर्माण झाला आहे. दोन्ही मेडिकल टेस्ट स्वंतत्रपणे वेगवेगळ्या रुममध्ये घेतल्या पाहिजे इतकी साधी गोष्ट अधिकाऱ्यांना कशी कळत नाही असा सवाल विचारला जात आहे.

पोलीस कॉन्स्टेबल भर्तीसाठी आलेल्या उमेदवारांना मेडिकल टेस्टसाठी भिंड येथील जिल्हा रुग्णालयात घेऊन जायचं होतं. धक्कादायक म्हणजे महिला आणि पुरुष उमेदवारांना मेडिकल टेस्टसाठी एकाच खोलीत नेण्यात आलं. याहून धक्कादायक म्हणजे महिला उमेदवारांची मेडिकल टेस्ट करण्यासाठी एकही महिला डॉक्टर तिथे उपस्थित नव्हती.

उमेदवारांची मेडिकल टेस्ट होत असतानाचे फोटो एएनआयने प्रसिद्ध केले आहेत. या फोटोत कशाप्रकारे सर्वांसमोर कपडे उतरवून मेडिकल टेस्ट केली जात असल्याचं पाहू शकता. आधीच छातीवर उमेदवारांची जात लिहिल्याने पोलिसांना संतापाला सामोरं जावं लागत असताना या घटनेने हा संताप वाढवला आहे.