वैद्यकीय तज्ज्ञांचा इशारा; चोवीस तासांत करोना रुग्णवाढीचा नवा विक्रम

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

भारतात करोना रुग्णांची संख्या वाढत असून या विषाणूचे समूहसंक्रमण सुरू झाले आहे, असा दावा विविध वैद्यकीय तज्ज्ञांनी केला आहे.

भारतीय वैद्यक संशोधन परिषदेच्या (आयसीएमआर) रक्तद्रव तपासणी सर्वेक्षणात मात्र देशात सामूहिक संक्रमण सुरू नसल्याचा निष्कर्ष नोंदविण्यात आला असून त्यावर या वैद्यकीय तज्ज्ञांनी टीका केली आहे. दरम्यान, देशात करोनाचे नकारात्मक विक्रम होत असून एकूण रुग्णसंख्येचा ३ लाखांचा आकडा पार झाला आहे. चोवीस तासांत ११ हजार ४५८ रुग्ण आढळले.

‘आयसीएमआर’चे प्रमुख बलराम भार्गव यांनी शुक्रवारी कोविड-१९ चे समूह संक्रमण सुरू झालेले नाही असा दावा केला होता. त्यांनी पुराव्यादाखल रक्तद्रव पाहणीचे निष्कर्षही सांगितले होते. त्या पाहणीनुसार ६५ जिल्ह्य़ांतील २६ हजार ४०० लोकांपैकी ०.७३ टक्के लोकांना करोनाची लागण झाली होती.

‘आयसीएमआर’चे माजी प्रमुख डॉ. एम. सी. मिश्रा यांनी म्हटले आहे, की देशात विषाणूचे समूह संक्रमण सुरू आहे याबाबत कोणतीही शंका नाही. टाळेबंदी उठवल्यानंतर लोकांची बरीच ये-जा सुरू झाली आहे, त्यामुळे हा विषाणू जिथे आधी नव्हता तिथे पोहोचला. त्यामुळे सरकारने सामूहिक संक्रमण झाल्याचे मान्य करावे. त्यामुळे लोक सतर्क होतील. ‘आयसीएमआर’च्या रक्तद्रव पाहणीच्या निकालांबाबत त्यांनी सांगितले, की २६ हजार ४०० हा नमुना अगदीच अपुरा आहे.

विषाणूतज्ज्ञ शाहीद जमील यांनी म्हटले आहे, की भारत फार आधीच समूह संक्रमणात पोहोचला असून आरोग्य अधिकारी ते मान्य करीत नाहीत. ‘आयसीएमआर’च्या मते ४० टक्के लोकांना सार्स सीओव्ही-२ ची लागण कुठलाही इतिहास नसताना झाली आहे. मग हे सामूहिक संक्रमण नाही तर काय आहे?

प्रसिद्ध शल्यविशारद अरविंद कुमार यांनी सांगितले, की सामूहिकसंक्रमण झाले नाही हे आयसीएमआरचे म्हणणे मान्य केले तरी दिल्ली, अहमदाबाद आणि मुंबईत तसे संक्रमण चालू आहे हे नाकारता येणार नाही. भारत हा मोठा देश आहे आणि तेथे विषाणू वेगवेगळ्या प्रमाणात पसरत आहे. प्रतिपिंड तयार होण्यास दोन आठवडे लागतात. त्यामुळे एप्रिलमध्ये जर ‘आयसीएमआर’ने पाहणी केली असेल तर सामूहिकसंक्रमण सुरू झाले नाही हे त्यांचे म्हणणे चुकीचे आहे.

निती आयोगाचे सदस्य व्ही.के. पॉल यांनी म्हटले आहे, की ३० एप्रिलला पाहणी करण्यात आली. मेच्या तिसऱ्या आठवडय़ात पाहणी करण्यात आली. त्यात प्रतिपिंड तयार होण्यास १५ दिवस लागतात असे मानले तरी त्यातून ३० एप्रिलची स्थिती स्पष्ट झाली आहे.

जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या सेंटर फॉर सोशल मेडिसीन अँड कम्युनिटी हेल्थ या संस्थेचे डॉ. विकास बाजपेयी यांच्या मते, जेव्हा रुग्णाचा संपर्क कुणाशीच आला नसताना तो बाधित होतो, तेव्हा त्याला समूहसंक्रमण म्हणतात. ‘आयसीएमआर’ने यात प्रतिबंधात्मक क्षेत्रात पाहणी केलेली नाही. विषाणूचा प्रसार सगळीकडे सारखा नसतो. विषाणू जिथे सक्रिय आहे ती ठिकाणेच पाहणीतून वगळली तर त्याला अर्थ नाही.

धारावी, दिल्लीत प्रत्यय

फोर्टिस एस्कॉर्टसचे डॉ. रविशेखर झा यांनी समूह संक्रमण सुरू झाल्याचे स्पष्ट केले. दिल्ली सरकारने संपर्क शोधणे सोडून दिले आहे, त्यामुळे त्यांना ती बाब समजली नाही आणि ते मान्य करण्यासही तयार नाही. धारावी आणि दिल्लीत हे समूह संक्रमण दिसून आले आहे. ‘आयसीएमआर’ने चुकीच्या ठिकाणी जाऊन पाहणी केली, त्यामुळे त्यांना समूह संक्रमण समजलेले नाही. एप्रिलच्या अखेरीस देशातील अवस्था तुलनेने चांगली होती.