नवी दिल्ली : वैद्यकीय पदव्युत्तर प्रवेशासाठी १६ जून रोजी घेण्यात येणारी आयएनआय सीइटी २०२१ परीक्षा सर्वोच्च न्यायालयाने महिनाभर लांबणीवर टाकली आहे. ही परीक्षा १६ जून रोजी घेण्याचा निर्णय मनमानी किंवा अनियंत्रिततेचा निदर्शक असून ही परीक्षा महिनाभर लांबणीवर टाकण्यात यावी असा आदेश न्यायालयाने अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेला  दिला. न्या. इंदिरा बॅनर्जी व न्या. एम. आर. शहा यांनी पदव्युत्तर वैद्यकीय परीक्षा आयएनआय सीइटी २०१२१ येत्या १६ जूनला घेण्यावर डॉक्टरांनी दाखल केलेली याचिका निकाली काढली. कोविड कामामुळे अनेक जण दूरच्या ठिकाणी असताना अशा प्रकारे १६ जूनला परीक्षा घेणे मनमानीचे आहे असे न्यायालयाने स्पष्ट केले. अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेच्या वतीने आयोजित परीक्षेसाठी ८१५ जागांसाठी ८० हजार विद्यार्थी बसणार आहेत. या ८१५ जागा एम्स, जेआयपीएमइआर, पुद्दुचेरी व निमहंस, बेंगळुरू, पीजीआयएमइआर, चंडीगड या संस्थांतील आहेत.

देशात दिवसभरात ९१,७०२ करोनारुग्ण

नवी दिल्ली : देशातील करोनाबाधितांची संख्या सलग चौथ्या दिवशी एका लाखापेक्षा कमी नोंदविली गेली. गेल्या २४ तासांत ९१ हजार ७०२ जणांना करोनाची लागण झाली असून चाचण्या होकारात्मक येण्याचे प्रमाण  ४.४९ टक्क््यांवर आले आहे, असे शुक्रवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या वतीने सांगण्यात आले.

देशातील करोनाबाधितांची संख्या दोन कोटी ९२ लाख ७४ हजार ८२३ वर पोहोचली आहे. तर गेल्या एका दिवसात ३,४०३ जणांचा मृत्यू झाल्याने मृतांची एकूण संख्या तीन लाख ६३ हजार ०७९ इतकी झाली आहे. उपचाराधीन रुग्णांच्या संख्येत घट झाली असून ही संख्या ११ लाख २१ हजार ६७१ वर पोहोचली आहे. हे प्रमाण एकूण बाधितांच्या ३.८३ टक्के इतके आहे. करोनातून बरे होण्याच्या प्रमाणात सुधारणा झाली असून ते ९४.९३ टक्के आहे.

देशात गेल्या २४ तासात ३,४०३ जणांचा मृत्यू झाला त्यामध्ये १,९१५ महाराष्ट्रातील आहेत तर देशात आतापर्यंत तीन लाख ६३ हजार ०७९ जणांचा मृत्यू झाला त्यापैकी एक लाख तीन हजार ७४८ जण महाराष्ट्रातील आहेत, असेही केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या वतीने सांगण्यात आले.